न्यूझीलंडमध्ये सुरू असलेला आयसीसी महिला वनडे विश्वचषक २०२२ अंतिम चरणात पोहोचला आहे. या विश्वचषकातील २८ वा सामना रविवारी (२७ मार्च) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात झाला. भारतीय संघासाठी ‘करा अथवा मरा’ अशी स्थिती असलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकाने ३ विकेट्स राखून विजय मिळवला आहे. त्यामुळे भारतीय संघाचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित ५० षटकांमध्ये ७ विकेट्स गमावत २७४ धावा केल्या होत्या. भारताकडून सलामीवीर स्म्रीती मंधाना, शेफाली वर्मा आणि कर्णधार मिताली राज यांनी शानदार अर्धशतके केली होती. स्म्रीतीने सलामीला फलंदाजीला येत ८४ चेंडूंमध्ये १ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ७१ धावा चोपल्या होत्या. तर शेफालीनेही ४६ चेंडूंमध्ये ८ चौकारांच्या मदतीने ५३ धावांची शानदार खेळी केली होती. या दोघींमध्ये पहिल्या विकेटसाठी प्रशंसनीय ९१ धावांची भागीदारीही झाली होती.
Heartbreak for India as South Africa seal a thrilling victory on the last ball 🤯#CWC22 pic.twitter.com/mrOzp6Fmmc
— ICC (@ICC) March 27, 2022
या दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर कर्णधार मिताली आणि उपकर्णधार हरमनप्रीत कौर यांनी मोर्चा सांभाळला होता. मितालीने ८ चौकारांच्या साहाय्याने ६८ धावा फटकावल्या, तर हरमनप्रीत ४८ धावांवर बाद झाली. इतर फलंदाजांना विशेष योगदान देता आले नव्हते. दक्षिण आफ्रिकेकडून या डावात शबनीम इस्माईल आणि मसाबाटा क्लास यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या होत्या.
गोलंदाजांचे गचाळ प्रदर्शन
मात्र भारतीय फलंदाजांच्या जबरदस्त प्रदर्शनावर गोलंदाजांच्या खराब कामगिरीने पाणी फेरले. दक्षिण आफ्रिकेच्या संपूर्ण डावादरम्यान धावा खर्च केल्यानंतर शेवटच्या षटकात मोक्याच्या क्षणी नो बॉल टाकल्याने भारतीय संघाला ३ विकेट्सने हा सामना गमवावा लागला.
भारताच्या २७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेकडून सलामीवीर लॉरा वालवार्डने सर्वाधिक ८० धावा फटकावल्या. तिने ७९ चेंडू खेळताना ११ चौकारांच्या मदतीने या धावा केल्या होत्या. तसेच मिगॉन डू प्रिजने शेवटपर्यंत नाबाद राहात ५३ धावांची शानदार खेळी केली. तिच्याखेरीज लारा गुडॉल हिनेही ४९ धावांचे योगदान दिले. परिणामी अखेरच्या चेंडूवर दक्षिण आफ्रिकेने सामना जिंकला.
Update: India’s campaign in the #CWC22 comes to an end. South Africa needed 1 off the final ball and managed to score the winning run.
Details ▶️ https://t.co/BWw8yYwlOS#TeamIndia | #CWC22 | #INDvSA pic.twitter.com/1EoGNKtujO
— BCCI Women (@BCCIWomen) March 27, 2022
भारतीय संघ विश्वचषकातून बाहेर
हा सामना गमावल्यानंतर भारतीय संघ विश्वचषकातून बाहेर पडला आहे. विश्वचषकातील ७ पैकी ३ सामने आणि ४ सामने गमावत भारतीय संघ गुणतालिकेत पहिल्या ४ स्थानांमध्ये उडी घेऊ शकला नाही आणि उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर झाला. भारताच्या पराभवामुळे वेस्ट इंडिजच्या संघाला फायदा झाला असून त्यांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका संघाने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. उपांत्य फेरीत त्यांचा सामना इंग्लंड संघांशी होईल.