नवी दिल्ली : भारत-न्यूझीलंड आणि श्रीलंका-वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटीनंतर आयसीसीने ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. मुंबई कसोटीचा ‘मॅन ऑफ द मॅच’ मयंक अग्रवालने फलंदाजीच्या क्रमवारीत कमालीची प्रगती केली आहे, तर एका डावात 10 बळी घेत इतिहास रचणाऱ्या न्यूझीलंडच्या एजाज पटेलने गोलंदाजीत मोठा फायदा करून घेतला आहे.
मयंक अग्रवालने मुंबई कसोटीत 150 आणि 62 धावांची शानदार खेळी खेळली. याचा त्याला रँकिंगमध्ये फायदा झाला आणि तो 30 स्थानांचा फायदा घेऊन 11व्या स्थानावर पोहोचला आहे. याशिवाय शुभमन गिलने 21 स्थानांची प्रगती करत 45व्या स्थानावर पोहोचला आहे. भारतासाठी पहिल्या दहामध्ये रोहित शर्मा पाचव्या आणि विराट कोहली सहाव्या स्थानावर आहे.
न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेलने 26 स्थानांची प्रगती करत 78 व्या स्थानावर पोहोचला आहे. श्रीलंकेचा धनंजय डी सिल्वा 12 स्थानांनी प्रगती करत 21 व्या, वेस्ट इंडिजचा क्रेग ब्रॅथवेट 10 स्थानांनी प्रगती करत 39 व्या आणि एनक्रुमाह बोनरने 17 स्थानांनी प्रगती करत 42 व्या स्थानावर पोहोचला आहे.गोलंदाजी क्रमवारीत मुंबई कसोटीच्या एका डावात १० बळी घेण्याचा अनोखा विक्रम करणारा एजाज पटेल २३ स्थानांनी पुढे ३८व्या स्थानावर पोहोचला आहे. भारताच्या मोहम्मद सिराजला चार स्थानांनी फायदा झाला असून तो 41व्या स्थानावर आहे. रविचंद्रन अश्विन दुसऱ्या स्थानावर असून त्याला ४३ गुणांचा फायदा आहे.