‘मी अर्धा भारतीय बनलोय आणि मला याचा अभिमान आहे’;निवृत्तीनंतर एबी डिविलियर्सचा भावुक संदेश

दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिविलियर्स याने शुक्रवार रोजी (१९ नोव्हेंबर) क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. मे २०१८ मध्येच डिविलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता. परंतु तो इतर लीग स्पर्धांमध्ये खेळताना दिसत होता. मात्र आता त्याने सर्वच प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. यानंतर त्याने आपल्या आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या चाहत्यांना भावनिक संदेश दिला आहे.

डिविलियर्स २०११ पासून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा (आरसीबी) भाग राहिला आहे. यादरम्यान तब्बल १५६ सामन्यात आरसीबीचे प्रतिनिधित्त्व करताना त्याने ४२ च्या सरासरीने ४४९१ धावा केल्या आहेत. जवळजवळ १० वर्षांच्या प्रवासानंतर आरसीबीची साथ सोडताना डिविलियर्सही भावनिक झाल्याचे दिसले.

आरसीबी संघानेही डिविलियर्सच्या निवृत्तीनंतर त्याच्या सन्मानार्थ आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवर त्याची प्रोफाइल फोटो ठेवली आहे. आरसीबीच्या ट्वीटर हँडलवरुन आपल्या चाहत्यांसाठी भावुक संदेश शेअर करताना डिविलियर्सने म्हटले की, ‘आरसीबी फ्रँचायझीचा प्रत्येक सदस्य माझ्यासाठी कुटुंबाप्रमाणे आहे. लोक येत जात राहतात, पण आरसीबीमध्ये जी भावना आहे ती नेहमी माझ्या चराचरात कायम राहिल. मी अर्धा भारतीय बनलो आहे आणि मला या गोष्टीवर गर्व आहे.’

तत्पूर्वी डिविलियर्सच्या निवृत्तीनंतर त्याचा जवळचा मित्र आणि आरसीबीचा संघसहकारी विराट कोहली यानेही भावनिक प्रतिक्रिया दिली होती. कोहलीने ट्वीट करत लिहिले होते की, ‘आमच्या वेळच्या सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आणि मला भेटलेल्या व्यक्तींपैकी सर्वात प्रेरणादायी असलेल्या व्यक्तीस, तू जे काही कमावले आहेस त्याचा तुझ्यासहित सर्वांना सार्थ अभिमान राहिल. तू रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी जे काही केले आहेस, ते सदैव आमच्या स्मरणात राहिल. फक्त क्रिकेटपुरतेच आपले नाते मर्यादित नव्हते आणि पुढेही ते असेच कायम राहिल.’
‘तुझ्या या निर्णयामुळे मला खूप दु:ख होते आहे. परंतु मला माहिती आहे, तू घेतलेला हा निर्णय तुझ्यासाठी आणि तुझ्या कुटुंबासाठी योग्य असेल. आय लव्ह यू,’ असे पुढे लिहित कोहलीने तुटलेल्या हृदयाचे इमोजी टाकले होते.कोहलीच्या या प्रतिक्रियेला उत्तर देताना डिविलियर्सने ‘लव्ह यू टू माझ्या भावा’ असे लिहिले होते.
You might also like

Comments are closed.