जालना (प्रतिनिधी)-ऑलम्पिक मध्ये केवळ दिल्ली मुंबई हरियाणाचेच खेळाडू जाऊ शकतात हा समज चुकीचा आहे, आज मीराबाई चानू तसेच प्रसिद्ध बॉक्सिंग मेरी कोम या अत्यंत दुर्गम भागातून आल्या आहेत. असे असतांना त्यांनी केलेले परिश्रम, ध्येयनिश्चिती आणि ते गाठण्यासाठी असलेली जिद्द या गुणांमुळेच देशाला सुवर्ण तसेच रौप्यपदक मिळवून दिले असे प्रतिपादन जालन्यातील क्रिडापटू अभिजित देशमुख यांनी केले.
त्यांनी जपान मध्ये जाऊन या ऑलम्पिक मध्ये कव्हरेज दिले होते. अभिजीत देशमुख हे जालना चे रहिवाशी असून ते सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, असे असतानाही त्यांना खेळाची आवड लहानपणापासून असल्याने ते नोकरी सांभाळून आपला छंद जपतात. केवळ छंद म्हणून नव्हे तर ते अभ्यासू पत्रकार म्हणून यात रस घेत असल्याचे त्यांनी सत्काराला उत्तर देताना म्हणाले. येथील समर्थ व्यायाम शाळेकडून अभिजीत देशमुख यांचा त्यांच्या आई-वडिलांसह रविवारी सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, भाजपा शहर अध्यक्ष राजेश राऊत, शेख चांद,बाला परदेशी यांच्यासह नागरिक उपस्थित होते. यावेळी अभिजित देशमुख यांनी आपला जालना टू जपान हा प्रवास सांगितला. तसेच खेळाडूंना जवळपास एक तास मार्गदर्शन केले.