आयपीएल २०२२ साठी सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघानेही आगामी हंगामासाठी तयारी पूर्ण केली आहे. यावेळी चेन्नईच्या संघात मोठा बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि महेंद्रसिंह धोनी यांनी संघ व्यवस्थापनाला आता भविष्यासाठीही तयारी करायची असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे धोनी आपले कप्तानपद दुसऱ्या खेळाडूकडे सोपवणार असल्याचे म्हटले जात आहे.
धोनी यावेळी रवींद्र जडेजाला त्याच्या जागी संघाचा कर्णधार बनवू शकतो, असे वृत्त समोर आले आहे. जडेजाने संघाची कमान सांभाळली तर धोनी त्याचा मार्गदर्शक असेल. चेन्नईने चार खेळाडूंना रिटेन केले आहे. यामध्ये संघाचा कर्णधार धोनी, रवींद्र जडेजा आणि ऋतुराज गायकवाड यांचा समावेश आहे.
ऋतुराजने गेल्या मोसमात संघाच्या विजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावली होती. याशिवाय विदेशी खेळाडूंमध्ये अष्टपैलू मोईन अलीची निवड करण्यात आली आहे. रवींद्र जडेजाला नंबर वन खेळाडू म्हणून कायम ठेवण्यात आले आहे. त्यानंतर धोनीचा क्रमांक लागतो. मोईन अली तिसऱ्या तर ऋतुराज गायकवाड चौथ्या क्रमांकाचा खेळाडू म्हणून रिटेन झाला आहे.
आयपीएल २०२१ मध्ये आरसीबी विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात जडेजाने हर्षल पटेलच्या एका षटकात ३७ धावा चोपल्या. आयपीएलमध्ये जडेजाने २०० सामन्यांमध्ये २३८६ धावा केल्या आहेत आणि १२७ विकेट्सही घेतल्या. जडेजामध्ये कर्णधार बनण्यासाठी आवश्यक असलेले सर्व गुण आहेत. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात जडेजा मातब्बर आहे.
रवींद्र जडेजाने चेन्नईसाठी १५ सामन्यात ११ बळी घेतले आणि २२७ उपयुक्त धावा केल्या. डेथ ओव्हर्समध्ये त्याने झंझावाती फलंदाजी करून महत्त्वाच्या प्रसंगी संघाला संकटातून बाहेर काढले. तो २०१२ पासून चेन्नई संघाचा भाग आहे.