दिल्ली – टोक्यो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या भारतीय पुरुष संघाला प्रो लीग हॉकीमध्ये पराभव पत्करावा लागला. शनिवारी रात्री झालेल्या लढतीत फ्रान्सने भारताला ५-२ अशी धूळ चारून त्यांचे विजयी हॅट्ट्रिक लगावण्याचे मनसुबे उधळून लावले.
जागतिक क्रमवारीत भारतीय संघ पाचव्या, तर फ्रान्स १२व्या स्थानी आहे. त्याशिवाय गेल्या आठवडय़ात झालेल्या पहिल्या टप्प्याच्या सामन्यात मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने फ्रान्सला नमवले होते. त्यामुळे भारताचे पारडे दुसऱ्या लढतीसाठीही जड मानले जात होते.
फ्रान्ससाठी व्हिक्टर चार्लेटने (१६ आणि ५९वे मिनिट) दोन गोल केले. स्टॅनली लॉकवूड (३५ मि.), चार्ल्स मॅसोन (४८ मि.) आणि टिम क्लायमेंट (६० मि.) यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला. भारताकडून जर्मनप्रीत सिंग आणि हरमनप्रीत सिंग यांनी अनुक्रमे २२ आणि ५७व्या मिनिटाला गोल केले. परंतु उर्वरित तीन गोल नोंदवण्यात भारतीय संघ अपयशी ठरला. या पराभवानंतरही भारत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी कायम असून त्यांच्या खात्यात तीन सामन्यांतील दोन विजयांचे सहा गुण जमा आहेत.