सुनील गावसकरांसाठी भारताचे ‘ते’ तीन खेळाडू ठरले स्पेशल!

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपाठोपाठ एकदिवसीय मालिकेमध्ये देखील भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे . एकदिवसीय मालिकेत ‘क्लीन स्वीप’ पत्करणाऱ्या भारतीय संघाच्या कामगिरीवर सध्या मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असतानाच आता भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्यामते तिसऱ्या सामन्यात भारताचा पराभव झाला असला, तरी तीन खेळाडूंची कामगिरी उंचावली असून त्यांच्यावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. यासंदर्भात त्यांनी तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने केलेल्या बदलांविषयी मत मांडलं आहे.

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारतानं वेंकटेश अय्यरऐवजी सूर्यकुमार यादवला संघात स्थान दिलं होतं. त्यासोबत भुवनेश्वर कुमारऐवजी दीपक चहर आणि शार्दुल ठाकूर ऐवजी प्रसिध कृष्णाला संघात स्थान देण्यात आलं होतं. हे तीन बदल करून देखील भारताला तिसऱ्या सामन्यात अवघ्या काही धावा विजयासाठी कमी पडल्या. या पार्श्वभूमीवर टीम इंडियाच्या कामगिरीवर टीका होत असताना सुनील गावसकर यांनी यातूनही भारतासाठी घडलेल्या सकारात्मक गोष्टीवर भूमिका मांडली आहे.

भारतीय संघात अंतिम सामन्यासाठी स्थान मिळालेल्या या तिघांनी आपल्या कामगिरीतून नक्कीच आपली दावेदारी सिद्ध केली आहे,असं गावसकर म्हणाले आहेत. हा तिसरा सामना मालिकेच्या दृष्टीने एक औपचारिकताच होती हे खरं आहे. पण त्यांच्यासाठी ते तसं नव्हतं. कारण त्यांच्यासाठी ही एक संधी होती. दक्षिण आफ्रिका निर्भेळ यशासाठी प्रयत्न करणार हे त्या तिघांना माहिती होतं. त्यामुळे त्यांच्यावर मोठा दबाव होता. पण त्यातूनही त्यांनी चांगली कामगिरी केली. त्यामुळे आपण त्यांच्यावर लक्ष केंद्रीत करायला हवं, असं गावसकर म्हणाले.

त्यांना असा विश्वास द्या की त्यांना आता जास्तीत जास्त संधी मिळणार आहेत. आता त्या तिघांची जागा संघाबाहेर नसून संघामध्ये आहे असं त्यांना वाटू द्या, असं देखील सुनील गावसकरांनी नमूद केलं आहे.

You might also like

Comments are closed.