पंचतारांकित विश्वविजय; इंग्लंडला नमवून भारताचा विजय

अँटिग्वा – शनिवार मध्यरात्रीपर्यंत रंगलेल्या अंतिम फेरीत यष्टीरक्षक दिनेश बाणाने महेंद्रसिंह धोनीने २०११मध्ये लगावलेल्या षटकाराची आठवण करून देणारा विजयी फटका लगावला. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या (१९ वर्षांखालील) भारतीय खेळाडूंनी वाऱ्याच्या वेगाने मैदानात धाव घेतली. यश धूलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या युवा शिलेदारांनी तमाम देशवासीयांच्या अपेक्षांची पूर्तता करताना इंग्लंडला चार गडी आणि १४ चेंडू राखून नामोहरम करत पाचव्यांदा जेतेपदावर मोहोर उमटवली. त्यामुळे वेस्ट इंडिजपासून भारतातही या यशाच्या जल्लोषातही चाहते न्हऊन गेले.

सर व्हीव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर झालेल्या या लढतीत इंग्लंडने दिलेले १९० धावांचे लक्ष्य भारताने ४७.४ षटकांत सहा फलंदाजांच्या मोबदल्यात गाठले. गोलंदाजीत पाच बळी मिळवल्यानंतर फलंदाजीतही ३५ धावांचे उपयुक्त योगदान देणारा राज बावा भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याला डावखुरा वेगवान गोलंदाज रवी कुमार (४/३४), उपकर्णधार शेख रशीद (८४ चेंडूंत ५० धावा) आणि निशांत सिंधू (५४ चेंडूंत नाबाद ५०) यांची बहुमूल्य साथ लाभली. भारताने यापूर्वी २०००, २००८, २०१२ आणि २०१८ या वर्षी युवा विश्वचषक जिंकला होता.

प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडची भारताच्या राज-रवी या वेगवान जोडीपुढे तारांबळ उडाली. कर्णधार टॉम प्रेस्ट (०), जॉर्ज थॉमस (२७), जॉर्ज बेल (०) असे महत्त्वाचे फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यामुळे इंग्लंडची एकवेळ ७ बाद ९१ धावा अशी अवस्था झाली. परंतु डावखुऱ्या जेम्स ऱ्यूने ११६ चेंडूंत ९५ धावांची जिगरबाज खेळी साकारून इंग्लंडला सावरले. त्याने जेम्स सेल्ससह (नाबाद ३४) आठव्या गडय़ासाठी ८३ धावांची भागीदारी रचल्यामुळे इंग्लंडने किमान पावणेदोनशे धावांचा टप्पा गाठला. रवीने ऱ्यूचा अडथळा दूर केला, मग राजने उर्वरित फलंदाजांना झटपट माघारी पाठवून इंग्लंडचा डाव ४४.५ षटकांत १८९ धावांत गुंडाळला.

लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने मुंबईकर सलामीवीर अंक्रिश रघुवंशीला (०) पहिल्याच षटकात गमावले. परंतु कणखर वृत्तीचा रशीद आणि हर्नूर सिंग (२१) यांनी दुसऱ्या गडय़ासाठी ४९ धावांची भर घातली. हर्नूर बाद झाल्यावर कर्णधार धूलने नेहमीच्या शैलीत आक्रमक फटकेबाजी करताना संघाची धावसंख्या शतकासमीप नेली. रशीद आणि धूल भारताला विजय मिळवून देणार, असे वाटत असतानाच रशीद अर्धशतक साकारून बाद झाला. दोन षटकांच्या अंतरात धूलही माघारी परतल्याने भारत ४ बाद ९७ अशा संकटात सापडला.

मात्र निशांत आणि राज यांनी पाचव्या गडय़ासाठी ६७ धावांची मोलाची भागीदारी रचून इंग्लंडच्या विजयाच्या आशांना सुरुंग लावला. अखेरीस दिनेशने सलग दोन षटकार लगावून भारताचा विजय साकारला.

You might also like

Comments are closed.