वडिल नाही बनू शकले क्रिकेटर, म्हणून उघडले किराणा दुकान; आता मुलाची थेट ‘टीम इंडिया’त निवड

येत्या नववर्षाच्या सुरुवातीला वेस्ट इंडिज येथे आयसीसीची १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा होणार आहे. १४ जानेवारी- ५ फेब्रुवारी २०२२ दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी काही दिवसांपूर्वीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय, ) १७ सदस्यीय संघ घोषित केला आहे. या संघाच्या नेतृत्त्वाची सूत्रे यश धुल याच्या हाती देण्यात आली आहेत. यशबरोबरच बऱ्याचशा क्रिकेटपटूंना खूप संघर्षानंतर या संघात जागा मिळाली आहे. यातीलच एक नाव म्हणजे, गाजियाबादच्या सिद्धार्थ यादव  याचे.

थेट आयसीसी विश्वचषकासाठी भारताच्या १९ वर्षीय संघात जागा मिळवणाऱ्या सिद्धार्थचा इथपर्यंतचा प्रवास सोपा राहिलेला नाही. त्याच्या याच संघर्षाच्या कहानीबद्दल आपण या लेखात जाणून घेणार आहेत.

वडिलांचे स्वप्न केले पूर्ण
सिद्धार्थ हा मूळचा गाजियाबादमधील कोटगांवचा राहणारा. त्याचे वडिल श्रवण यादव हे किराणा दुकानदार आहेत. त्यांना मोठे होऊन क्रिकेटपटू बनायचे होते. परंतु ते नेट बॉलरच्या रुपातच भारतीय संघाचा भाग राहिले आणि मुख्य संघात त्यांना जागा मिळवता आली नाही. परंतु आता त्यांचा मुलगा सिद्धार्थ युएईत आशिया चषक आणि वेस्ट इंडिजमध्ये १९ वर्षांखालील विश्वचषकात भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व करत त्यांचे स्वप्न पूर्ण करेल

डाव्या हाताचा फलंदाज असलेल्या सिद्धार्थचे वडिल सांगतात की, त्यांनी लहानपणीच सिद्धार्थला डावखुरा फलंदाज बनवण्याचा निर्धार केला होता. ते म्हणाले की, “सिद्धार्थने जेव्हा पहिल्यांदा हातात बॅट घेतली होती, तेव्हा त्याने डावखुऱ्या फलंदाजांप्रमाणे उभा राहिला होता. तेव्हाच मी ठरवले होते की, सिद्धार्थला मोठा झाल्यानंतर डावखुरा फलंदाजच बनवायचे आहे.”

वयाच्या आठव्या वर्षानंतर त्याने क्रिकेटला अजून गांभिर्याने घ्यायला सुरुवात केली होती. त्याच्यात क्रिकेटप्रती प्रेम निर्माण करण्यात त्याच्या वडिलांचा मोठा हात राहिला आहे. त्याचे वडिल श्रवण हे दिवसभरातील ३ तास आपले किराणा दुकान बंद ठेवून सिद्धार्थला फलंदाजीचा सराव करवून घेत असायचे. ते सिद्धार्थला थ्रो डाऊन करत असायचे आणि सिद्धार्थ त्यावर फलंदाजीचा सराव करत असे. अशाप्रकारे त्यांनीच सुरुवातीची काही वर्षे स्वत सिद्धार्थला क्रिकेट खेळायला शिकवले होते.

आयसीसी १९ वर्षांखालील स्पर्धेसाठी भारताचा १७ सदस्यीय संघ- यश धुल (कर्णधार), हरनूर सिंग, अंघक्रिश रघुवंशी, एसके राशिद (उपकर्णधार), निशांत सिंधू, सिद्धार्थ यादव, अनिश्वर गौतम, दिनेश बाना (यष्टीरक्षक), आराध्य यादव (यष्चीरक्षक), राज अंगद बावा, मानव प्रकाश, कौशल तांबे, आर एस हंगरगेकर, वासू वत्स, विकी ओत्सवाल, रविकुमार, गर्व संगवान.

स्टँडबाय खेळाडू- ऋषित रेड्डी, उदय सहारन, अंश गोसाई, अमृत ​​राज उपाध्याय, पीएम सिंह राठौर

You might also like

Comments are closed.