बीजिंग – चिनी टेनिसपटू पेंग श्वेइने मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये समाजमाध्यमावर पोस्ट लिहून चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे वरिष्ठ नेते झांग गाओली यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप लावले होते. मात्र आता तिने पुन्हा घूमजाव करताना मी असे कोणतेही आरोप केले नसल्याचे फ्रान्समधील एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
लेकीप’ नामक क्रीडा वृत्तपत्राने रविवारी चीन ऑलिम्पिक संघटनेमार्फत आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या साहाय्याने पेंगसोबत संवाद साधला. लैंगिक अत्याचाराचे आरोप केल्यानंतर पेंग काही काळ बेपत्ता होती. त्यामुळे तिच्याबाबतीत सर्वच स्तरांतून चिंता व्यक्त करण्यात येत होती. मात्र ही चिंता केवळ गैरसमजातून निर्माण झाल्याचे मत पेंगने व्यक्त केले आहे.
माझ्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे मी कधीही म्हटले नाही. बाहेरील व्यक्तींनी माझ्या पोस्टचा चुकीचा अर्थ काढला. त्यामुळेच गैरसमज निर्माण झाला आणि लोकांना चिंता वाटू लागली,’’ असे पेंगने सांगितले. पेंगने डिसेंबरमध्येही एका मुलाखतीत आपण अत्याचाराचे आरोप लावले नसल्याचे म्हटले होते.