अहमदाबाद – भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका (India vs West Indies) खेळण्यात व्यस्त आहे. या मालिकेतील पहिला सामना पार पडला आहे, तर दुसरा सामना बुधवारी म्हणजे (९ फेब्रुवारी) होणार आहे.याच दरम्यान, हा सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघासाठी खुशखबर आली आहे. भारताचे फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) या दोघांचीही कोरोना व्हायरसपासून मुक्ती झाली असून ,आता त्यांना सरावाची परवानगी मिळाली आहे. पण, दुसऱ्या वनडेसाठी त्यांच्या उपलब्धतेवर अजूनही प्रश्नचिन्ह आहे.
या वनडे मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी श्रेयस अय्यर, शिखर धवन, ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि नवदीप सैनी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे त्यांना पहिल्या वनडेतून बाहेर व्हावे लागले होते. पण, मंगळवारी (८ फेब्रुवारी) समजलेल्या माहितीनुसार शिखर आणि श्रेयस यांचा कोरोना अहवाल निगेटीव्ह (Covid-19) आला आहे. तर सैनी यापूर्वीच भारतीय संघात दाखल झाला आहे. मात्र, ऋतुराज अजूनही आयसोलेशनमध्ये आहे.
एका सुत्राने पीटीआयला सांगितले की, ‘शिखर आणि श्रेयस यांचा कोविड-१९ अहवाल निगेटीव्ह आला असून त्यांना सरावाची परवानगी देण्यात आली आहे. ऋतुराज गायकवाड अद्याप आयसोलेशनमध्ये आहे.’त्यामुळे आता मंगळवारी संध्याकाळी भारतीय संघाबरोबर सराव सत्रात शिखर आणि श्रेयस सामील होऊ शकतात. असे असले, तरी त्यांच्याकडून सोपे ट्रेनिंग करून घेतले जाणार असून बीसीसीआयच्या मेडिकल टीमचे त्यांच्यावर लक्ष असेल. तसेच त्यांच्या दुसऱ्या वनजडेसाठीच्या उपलब्धतेबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे मालिका अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना ९ आणि तिसरा सामना ११ फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने ६ विकेट्सने जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.