विश्वातील अग्रगण्य टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचच्या कारकीर्दीत सुरू असलेले थरारनाटय़ दिवसेंदिवस रंगतदार वळण घेत आहे. शनिवारी जोकोव्हिचला पुन्हा अवैध स्थलांतरितांच्या हॉटेलमध्ये दाखल करण्यात आले असून, रविवारी त्याला परत पाठवणीबाबत होणाऱ्या न्यायालयीन सुनावणीकडे तमाम क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.
ऑस्ट्रेलियन खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेला सोमवार, १७ जानेवारीपासून प्रारंभ होणार असून ,जोकोव्हिचच्या समावेशाबाबत अद्याप संभ्रम आहे. शुक्रवारी ऑस्ट्रेलियन सरकारने दुसऱ्यांदा जोकोव्हिचचा व्हिसा रद्द केला. परकीय नागरिकविषयक खात्याचे मंत्री (इमिग्रेशन मिनिस्टर) अॅलेक्स हॉक यांनी जोकोव्हिचबाबत नियमांशी तडजोड करण्यास नकार दर्शवल्याने रविवारी केंद्रीय न्यायालय या प्रकरणावर निर्णय देईल. शनिवारी ३४ वर्षीय जोकोव्हिचला असंख्य सुरक्षारक्षकांच्या बंदोबस्तात पुन्हा स्थलांतरितांच्या हॉटेलमध्ये नेण्यात आले. सकाळी त्याला सीमा सुरक्षा दलासमोर मुलाखतीसाठी हजर केले. या वेळी जोकोव्हिचचे वकील निकोलस वूडसुद्धा उपस्थित होते.
जोकोव्हिचला ठेवण्यात आलेल्या हॉटेलबाहेर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचा घोळका जमला असून ऑस्ट्रेलियातील काही नागरिकसुद्धा जोकोव्हिचला पाठिंबा देण्यासाठी रस्तावर उतरले होते.
जोकोव्हिचच्या समावेशाबाबत प्रश्नचिन्ह कायम असल्याने आयोजक रविवार सायंकाळपर्यंत पहिल्या दिवसाची कार्यक्रमपत्रिका जाहीर करणार नाहीत. जोकोव्हिचने माघार घेतल्यास त्याची जागा कार्यक्रमपत्रिकेत पाचवा मानांकित आंद्रे रुब्लेव्ह घेईल. तसेच पात्रता फेरीतील एखादा स्पर्धक नशिबाच्या बळावर मुख्य फेरीसाठी पात्र होईल.