दक्षिण आफ्रिकेतील सर्वात लहान उंचीच्या तेम्बा बव्हुमाने विजयी चौकार लगावला आणि विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघावर मोठी नामुष्की ओढवली. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड यांसारख्या बलाढय़ संघांना त्यांच्याच भूमीत धूळ चारणाऱ्या भारताचे आफ्रिकन भूमीत कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न ३० वर्षांनंतरही अधुरेच राहिले. या मानहानीकारक पराभवानंतर कोहलीने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला असून अन्य खेळाडूंच्या कामगिरीचाही पंचनामा सुरू आहे.
राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारताने सेंच्युरियनची कसोटी सहज जिंकून सरत्या वर्षांला दिमाखात निरोप देत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. परंतु नव्या वर्षांत कर्णधार डीन एल्गरच्या आफ्रिकेने जोहान्सबर्ग आणि केपटाऊन येथील कसोटी सामने जिंकत २-१ अशा फरकाने मालिका जिंकली. तिन्ही सामन्यांत आफ्रिकेने नाणेफेक गमावली, तर अखेरच्या दोन सामन्यांत त्यांनी चौथ्या डावात धावांचा यशस्वी पाठलाग केला. त्यामुळे १९९२ पासून आफ्रिका दौऱ्यावर जाणाऱ्या भारताची मालिकाविजयाची प्रतीक्षा कायम आहे. संघातील प्रत्येक खेळाडूची तुलना करायची झाल्यास भारतीय संघ आफ्रिकेपेक्षा कौशल्य आणि अनुभवाच्या बाबतीत वरचढ असल्याचे दिसून येते. मात्र तरीही मोक्याच्या क्षणी कामगिरी उंचावण्यात भारताचे रथी-महारथी अपयशी ठरले. या पराभवानंतर काही खेळाडूंच्या संघातील स्थानाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने राष्ट्रीय निवड समितीला लवकरच कठोर पावले उचलावी लागणार आहेत.
भारताच्या पराभवामागील प्रमुख कारण म्हणजे फलंदाजांचे अपयश. त्यातही चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या अनुभवी जोडीच्या सुमार कामगिरीचा भारताला फटका बसला. वाँडर्स येथील दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावातील अर्धशतकांव्यतिरिक्त रहाणे-पुजारा संपूर्ण मालिकेत चाचपडताना दिसले. पुजाराने गेल्या तीन वर्षांत एकही शतक नोंदवलेले नाही, तर रहाणेने २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीत अखेरचे शतक साकारले होते. या दौऱ्यापूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही छाप पाडू न शकल्यामुळे मुंबईकर रहाणेने कसोटी उपकर्णधारपदही गमावले आहे.
त्यामुळे आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कोहलीने या दोन्ही खेळाडूंच्या भवितव्याबाबत बोलण्यास नकार देताना निवड समितीला विचारण्याची सूचना केली. आता श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल यांसारखे असंख्य पर्याय उपलब्ध असताना रहाणे-पुजारा या दोन्ही ३३ वर्षीय खेळाडूंवर निवड समिती आणखी किती काळ भरवसा ठेवणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.