इंडियन प्रीमियर लीग २०२२ ही २६ मार्चपासून सुरू होत असून आयपीएलचा चॅम्पियन कोणता संघ ठरणार? याकडे सर्वांचे लक्ष्य लागले असेल. या आयपीएल हंगामात सर्वच संघ बदलले आहेत, त्यामुळे कोणत्याच संघाची भविष्यवाणी केली जाऊ शकत नाही. भारतीय संघाचे माजी सलामीवीर फलंदाज सुनील गावसकर यांनी सांगितले आहे की, यावर्षी कोणता संघ आयपीएलचे विजेतेपद पटकावेल. त्यांच्या मते मुंबई संघ यावर्षी सुद्धा आयपीएलचे विजेतेपद जिंकू शकतो. मुंबईने आत्तापर्यंत ५ वेळा आयपीएलची ट्राॅफी जिंकलेली आहे.
गावसकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “पुन्हा एकदा रोहित शर्माकडे सहाव्यांदा आयपीएलची ट्राॅफी जिंकण्याची संधी आहे. मुंबई संघात खूप नविन खेळाडू आहेत आणि आता संघ जून्या संघासारखा दिसत नाही. रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली संघ पूढे जाऊ शकतो आणि सहाव्यांदा ट्राॅफी जिंकण्याचा विक्रम करु शकतो. मुंबई संघाला माहित आहे की सामना कसा जिंकला पाहिजे. यामुळेच पराभवाच्या स्थितीत सुद्धा संघाने पुनरागमन करत सामने जिंकले आहेत. हा संघ प्रत्येक हंगामात हळू सुरुवात करतो, परंतु यावेळी जास्त संघ असल्यामुळे त्यांच्याकडे खुप वेळ आहे.”
गावसकर पुढे म्हणाले की, “मुंबईकडे रोहित शर्मासारखा कर्णधार आहे, जो शानदार फलंदाजी करु शकतो. तसेच जसप्रीत बुमराहसारखा शानदार गोलंदाज आहे, त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा आयपीएल ट्राॅफी जिंकली तरी कोणी आश्चर्यचकित झाले नाही पाहिजे. आयपीएलमध्ये सर्वाधिक ५ वेळा मुंबईनेच ट्राॅफी जिंकली आहे. २०२१ च्या हंगामात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाने काही खास कामगिरी केली नाही, त्यामुळे संघाने ट्राॅफी जिंकली नाही.” गावसकर यांनी या हंगामात मुंबई संघ आवडता संघ असल्याचे सांगितले आहे.
आयपीएलचा पहिला सामना २६ मार्चला केकेआर आणि सीएसके संघांमध्ये पार पडणार आहे. यावर्षी आयपीएलचे सर्व सामने पुणे आणि मुंबईच्या ४ मैदानांमध्ये पार पडणार आहेत. तर या हंगामात १० संघ खेळताना दिसणार आहेत. मुंबई संघ आपला पहिला सामना २७ मार्चला दिल्ली संघाविरुद्ध खेळणार आहे.