नवी दिल्ली –वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी मर्यादित षटकांच्या मालिकांपूर्वी भारतीय क्रिकेट संघात करोनाचा शिरकाव झाला आहे .तर अनुभवी सलामीवीर शिखर धवन, नवोदित ऋतुराज गायकवाड आणि मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यर यांचा अहवाल सकारात्मक आला आहे. तसेच प्रशासकीय साहाय्यकांनाही करोनाची बाधा झाली आहे.

भारत आणि विंडीज या संघांमध्ये प्रत्येकी तीन सामन्यांची एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकांच्या तयारीसाठी भारतीय संघ ३१ जानेवारीला अहमदाबाद येथे दाखल झाला. त्यानंतर खेळाडू तीन दिवस विलगीकरणात होते. ‘‘धवन, गायकवाड आणि श्रेयस यांचा करोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आला आहे. तसेच दोन ते चार प्रशासकीय साहाय्यकांनाही करोनाची बाधा झाली आहे,’’ असे ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी सांगितले.

उभय संघांतील एकदिवसीय मालिकेचे सामने अहमदाबाद येथे खेळवले जाणार आहेत. ६ फेब्रुवारीला होणारा मालिकेतील पहिला सामना हा भारताचा १०००वा एकदिवसीय सामना असेल. मात्र, करोनाबाधित असल्याने धवन, गायकवाड आणि श्रेयस हे पहिल्या सामन्याला मुकणार हे जवळपास निश्चित आहे. त्यांना आठवडाभर विलगीकरणात राहावे लागणार आहे. त्यानंतर दोन वेळा करोनाच्या आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल नकारात्मक आल्यावर त्यांना पुन्हा संघात दाखल होता येईल.

या तिघांच्या अनुपस्थितीत शाहरूख खान, आर. साई किशोर व रिशी धवन या खेळाडूंना संधी मिळू शकेल. तसेच केएल राहुलही पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळणार नसल्याने कर्णधार रोहित शर्मासोबत डावखुरा वेंकटेश अय्यर भारताच्या डावाची सुरुवात करू शकेल.

You might also like

Comments are closed.