औरंगाबाद (प्रतिनिधी): महानगरपालिका आणि व्हेरॉक इंजिनिअरींग लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने एमजीएम स्पोर्ट्स मैदानावर झालेल्या अंतिम लढतीत कमबाईन बँकर्स संघाने जिल्हा परिषद संघाचा ५४ धावांनी पराभव करत टी-२० स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
बलाढ्य कम्बाईन बँकर्सकडून इनायत सय्यदने धारदार मारा (४ बळी) करत जिल्हा परिषदेच्या फलंदाजांचे कंबरडेच मोडले.विजयासाठी दिलेले १५५ धावांचे आव्हान ओलांडताना जिपचा डाव सुरूवातीलाच गडगडला.विजय सोनवणे २३, सय्यद अली २० आणि अमोल १४ हेच दुहेरी आकडा गाठू शकले.
कम्बाईन बँकर्सकडून शाम लहाने, इम्रान खान यांनी प्रत्येकी २ तर कुणाल फलकने १ गडी बाद करत विजयात हातभार लावला.
तत्पूर्वी गुणी अष्टपैलू हरमितसिंग रागी याच्या धडाकेबाज ५ चौकारांसह ३२, कुणाल फलकच्या २९, हरमितसिंग अलगच्या २७ धावांच्या जोरावर कम्बाईन बँकर्सने ९ गडी बाद १५४ अशी मजबूत धावसंख्या उभारली.जिपकडून अमोलने २, कंवरसिंग, अब्दुल वाहिदने प्रत्येकी एकेक गडी बाद केला.
विजेता, उपविजेता संघांना महानगरपालिका आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय, उपायुक्त सोमनाथ जाधव , व्हेरोकचे चैतन्य जाधव, शंकर पार्वती, विश्वनाथ राजपूत , दिपक जावळे, मनपा क्रीडा अधिकारी संजय बालयया , विजय मगरे, मोहसीन खान, राम प्रधान, सचिन भालेराव, अनिल बनकर आदींच्या उपस्थितीत चषक, पारितोषिके देण्यात आली.