औरंगाबाद – महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या सदस्यपदी औरंगाबादचे डॉ. उदय डोंगरे यांच्या रूपाने मराठवाड्याला पहिले प्रतिनिधित्व मिळाले आहे. तसेच डॉ.रंजन बडवणे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे संचालक झाले. या दोघांची निवड हा क्रीडा संघटक आणि खेळडूंचा खऱ्या अर्थाने सन्मान असल्याचे मत औरंगाबाद जिल्हा ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे यांनी सांगितले. मराठवाड्यात जास्तीतजास्त स्पर्धा खेचून आणण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार असल्याचा मनोदय डॉ. डोंगरे आणि डॉ. बडवणे यांनी व्यक्त केला.
सोमवारी रात्री या दोघांचा सत्कार सोहळा औरंगाबाद जिल्हा ऑलिम्पिक संघटनेतर्फे करण्यात आला. या सत्कार सोहळ्याला डॉ.मकरंद जोशी, डॉ. दयानंद कांबळे, सचिव गोविंद शर्मा, अमृत बिऱ्हाडे, तात्या जोशी, राकेश खैरनार, डॉ. संदीप जगताप, अभय देशमुख, चरणजितसिंग संघा, भिकन आंबे, नीरज बोरसे, पप्पू खांड्रे, दिनेश वंजारे आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंकज भारसाखळे यांनी केले. यामध्ये त्यांनी सांगितले की, डॉ. उदय डोंगरे यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या सदस्यपदी निवड होणे ही मराठवाड्यासाठी अभिमानाची बाब आहे.अशी निवड होणारे ते मराठवाड्यातील पहिले क्रीडा संघटक आहेत. त्यांच्या माध्यमातून मराठवाड्यातील खेळाडूंच्या प्रश्नांना व्यापक व्यासोइथंवर वाचा फोडता येईल, असे मत भारसाखळे यांनी व्यक्त केले. डॉ. डॉ.मकरंद जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की रंजन बडवणे यांनी विनाअनुदानित महाविद्यालयात सेवा बजावत खेळाडूंसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. त्याचे फळ म्हणून डॉ. बडवणे हे क्रीडासंचालक झाले आहेत.
जास्तीतजास्त स्पर्धा मराठवाड्यात आणणार: डॉ. डोंगरे
डॉ. उदय डोंगरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जास्तीतजास्त स्पर्धा मराठवाड्यात व्हाव्यात असे सांगितले. कोणत्याही खेळात भेदभाव करणे योग्य नाही आणि प्रत्येक खेळाला तेवढेच महत्व मिल्ने अपेक्षित आहे. सगळ्या संघटकांनी देखील तसेच वागले पाहिजे असे मत डॉ.उदय डोंगरे यांनी व्यक्त केले. मराठवाड्यात ज्या खेळांना आज चांगले दिवस आले, त्या खेळांसाठी संघटकांनी घेतलेल्या मेहनतीचे हे फळ असल्याचे मत डॉ डोंगरे यांनी व्यक्त केले.
खेळाडूंना प्रोत्साहन देण्यास प्राधान्य: डॉ. बडवणे
आपल्याला क्रीडा विभागाच्या संचालक पदाची जबाबदारी मिळाली असून आपल्या संपूर्ण कार्यकाळात खेळाडू हाच आपल्या कामाचा केंद्रबिंदू राहणार असल्याचे डॉ. रंजन बडवणे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. आपण मोठा काळ अनेक स्पर्धांचे आयोजन केले आणि त्याचा लाभ आज अनेकांना होतो आहे. या स्पर्धांच्या आयोजनाचा आणि खेळाडूंच्या अडचणींचा अभ्यास आपल्याला असल्याने त्यांना शक्यतो कोणत्या अडचणी येणार नाहीत, याची खबरदारी आपण घेणार आहोत. यापुढे मराठवाड्यातील शहरींसह ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्सान देण्यास आपले प्राधान्य राहणार असल्याचे डॉ. बडवणे म्हणाले.