छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पेतून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगरत रविवारी (१८ सप्टेंबर) ‘रन फॉर युनिटी’ दौड घेण्यात आली. देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षेचा संदेश देत छत्रपती संभाजीनगरकर ‘रन फॉर युनिटी’ या एकता दौडीमध्ये मोठ्या उत्साहाने धावले. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे कॅबिनेट मंत्री रोजगार हमी योजना व फलोत्पादन संदिपान भुमरे , कॅबिनेट कृषिमंत्री अब्दुल सत्तार, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल , आमदार रमेश बोरनारे , विधान परिषदेची विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, लोकसभा खासदार इम्तियाज जलील या सर्व नेत्यांनी दांडी मारली.
विभागीय क्रीडा संकुल येथून दौडला सुरुवात झाली. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते एकतेची मशाल पेटविल्यानंतर रन फॉर युनिटी दौडला प्रारंभ झाला. या प्रसंगी राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
रन फॉर युनिटी’मध्ये धावले छत्रपती संभाजीनगरकर !
अखंडतेचा दिला संदेश
विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा चौक, गजानन महाराज मंदिर चौक व पुन्हा त्याच मार्गाने दौड विभागीय क्रीडा संकुलात गेल्यानंतर समारोप करण्यात आला. विशेष म्हणजे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी स्वतः या दौडमध्ये सहभाग नोंदविला. ही धाव राष्ट्रीय एकतेला, एकात्मतेला समर्पित करण्यात आली. आठ वर्षाच्या मुलापासून ८० वर्षांच्या वृद्धापर्यंत सर्व वयोगटातील नागरिक यामध्ये सहभागी होऊन हा देश एक राहील, देशाची अखंडता कोणीही दूर करू शकणार नाही, अशा प्रकारचा संदेश या दौडच्या माध्यमातून दिला.
यशस्वीतेसाठी यांनी घेतला पुढाकार
रन फॉर युनिटी’चे आयोजन यशस्वीरित्या करण्यासाठी उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख, मनपा उपायुक्त रवींद्र निकम, पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दयानंद कांबळे, शिक्षण विस्तार अधिकारी सीताराम राऊत, क्रीडा अधिकारी लता लोंढे, मनपा क्रीडा अधिकारी संजय बाल्लया यांच्यासह विविध खात्यातील अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, उद्योजक हर्षवर्धन कराड, डॉक्टर असोसिएशनचे डॉ. प्रफुल्ल जटाळे, रिलॅक्स झीलचे संजय पाटील, अल्टिमेट जिमचे रिझवान शेख, अॅथलेटिक्स कोच सुरेंद्र मोदी, टीएफआयचे दीपक कोलते, गजानन वाबळे, राहुल डुकरे, अनंत वजंरीनकर, मंगेश तोडेकर आदींनी परिश्रम घेतले. या दौडमध्ये सहभागींना ग्रीन ग्लोब फाऊंडेशन आणि टीएफआयतर्फे सिडबॉल देण्यात आले.
भारताला विश्वगुरू बनविण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे- डॉ. भागवत कराड
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून मराठवाडा मुक्ती संग्रामाचा आझादी का अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. सरदार वल्लभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री होते. त्यावेळेस ५६४ संस्थान या देशांमध्ये होत्या. ५६४ संस्थानला एकत्र करून एक भारत बनवण्याचे काम सरदार वल्लभाई पटेल यांनी केले. त्यावेळेस हैदराबाद हे संस्थान वेगळे होतं. ते अखंड भारतात सामील होत नव्हतं. सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्यावेळी मराठवाडा, तेलंगणा असो की कर्नाटक यांना भारतामध्ये सामील होण्यास भाग पाडले.आपल्या भारतात वेगवेगळ्या जाती, धर्माचे लोक राहत असले, राज्य वेगळे असले, आपली भाषा वेगळी असली तरी आपण सर्वजण एक आहोत, भारतीय आहोत. १७ सप्टेंबर हा दिवस आपल्यासाठी महत्वाचा आहे. या दिवशी मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त झाला. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या माध्यमातून ज्या ज्या स्वतंत्र सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, ज्यांनी जेलमध्ये जाऊन आपल्यासाठी त्याग केला त्यांचे स्मरण या माध्यमातून करायचे आहे. पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपणाला एक श्रेष्ठ भारत करायचा आहे. भारताला जगामध्ये विश्वगुरू बनवायचे असेल तर सर्वांनी एकत्र येऊन या भारत देशाला पुढे नेण्यासाठी काम करण्याची गरज आहे. ‘रन फॉर युनिटी’ हे एक माध्यम असून सर्वांनी एकसंघ होण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले. तसेच असे उपक्रम दरवर्षी राबविण्यात येणार असल्याचे डॉ. कराड यांनी जाहीर केले.
यांनी नोंदविला सहभाग
‘रन फॉर युनिटी’ या उपक्रमात शहरातील ३० शाळा- महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसह सीएमआय, व्यापारी महासंघ, मसिआ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, महापालिका, पंचायत समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, छावणी परिषद, पोलिस विभाग, आरटीओ, स्काऊट गाईड, एनसीसी, वन विभाग, केंद्रीय माहिती विभाग, औरंगाबाद फर्स्ट, गेट गोइंग, ब्लॅक बक्स, क्रेडाई, डॉक्टर असोसिएशन, सीए असोसिएशन, रोटरी, जायंट्स, लायन्स क्लब, माजी सैनिक विभाग, एनजीओ अशा विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह क्रीडा क्षेत्रातील विविध खेळांच्या क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.