सूरत- टेबल टेनिसमध्ये सानील शेट्टी याच्या दुहेरी कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्राने पुरुषांच्या गटात उत्तर प्रदेशला ३-१ असे हरवले. महिलांमध्ये महाराष्ट्राने गुजरातचा ३-० असा दणदणीत पराभव केला. पाठोपाठ त्यांनी तेलंगणाला ३-० असे नमविले.या स्पर्धेतील सांघिक लढतींना येथील आंतरराष्ट्रीय इनडोअर स्टेडियम मध्ये प्रारंभ झाला.
शेट्टी याने एकेरीच्या पहिल्या लढतीत उत्तर प्रदेशच्या दिव्येश श्रीवास्तव याला ११-९,११-५,७-११,११-९ असे पराभूत केले पाठोपाठ सिद्धेश पांडे याने अभिषेक यादव याच्यावर ७-११, ११-७,४-११,११-४,११-८ असा रोमहर्षक विजय नोंदविला आणि महाराष्ट्राला २-० अशी आघाडी मिळवून दिली. तथापि दीपित पाटील या महाराष्ट्राच्या खेळाडूला उत्तर प्रदेशच्या सार्थ मिश्रा याने ११-४,११-८,६-११,६-११,११-९ असे पराभूत करीत सामन्यात उत्सुकता निर्माण केली.
शेट्टी याने पुन्हा टॉप स्पीन व काउंटर ॲटॅक असा खेळ करीत उत्तर प्रदेश या अभिषेक यादव याचा ११-४,११-९,९-११,११-६ असा पराभव केला त्यामुळे महाराष्ट्राला ही लढत ३-१ अशी जिंकता आली.महिलांमध्ये महाराष्ट्राला विजय मिळवताना फारशी अडचण आली नाही.
जागतिक स्पर्धेसाठी निवड झालेल्या दिया चितळे हिने महाराष्ट्राला पहिली लढत जिंकून दिली. तिने फ्रेनाझ चिपिया हिचा ११-९,११-६,१२-१० असा पराभव केला. पाठोपाठ स्वस्तिका घोष हिने कृतिका सिन्हा रॉय याच्यावर ११-४, १०-१२, ११-४, ७-११,११-९ अशी मात केली आणि महाराष्ट्राला २-० असे आघाडीवर नेले. राष्ट्रकुल स्पर्धेत प्रतिनिधित्व करणाऱ्या रीथ रीशा टेनिसन हिने फिलझा फातिमा कादरी हिला ११-९,११-७,७-११,११-४ असे हरवीत महाराष्ट्राला ३-० असा सफाईदार विजय मिळवून दिला.
महिलांच्या दुसऱ्या साखळी सामन्यात महाराष्ट्राने तेलंगणाचा ३-० असा सहज पराभव केला. दिया चितळे हिने एकेरीच्या पहिल्या लढतीत वरुणी जयस्वाल हिच्यावर ११-७,१२-१०,११-६ अशी मात केली. स्वस्तिका घोष हिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारताची खेळाडू अकुला श्रीजा हिला ११-७, ११-९,१२-१४,११-४ असे हरवीत महाराष्ट्राला २-० अशी मिळवून दिली. तिसऱ्या लढतीत रीथ रीशा टेनिसन हिने निखात बानू हिला ६-११,५-११,११-३,११-८,११-९ असे संघर्षपूर्ण लढतीनंतर पराभूत केले आणि महाराष्ट्राला विजय मिळवून दिला.