शतकवीर मयंकचे सहकाऱ्याने केले कौतुक; म्हणाला, “ही महान कामगिरी…”

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी (३ डिसेंबर) सुरू झाला. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचा सलामीवीर मयंक अगरवालने अप्रतिम फलंदाजीचे प्रदर्शन करत शतक पूर्ण केले. मयंकच्या या खेळीसाठी सर्वत्र त्याचे कौतुक केले जात आहे. अशातच त्याचा संघातील सहकारी आणि या सामन्यात त्याच्यासोबत खेळपट्टीवर सलामीसाठी आलेल्या शुबमन गिलने देखील त्याची पाठ थोपटली.
मयंक अगरवालने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत २४६ चेंडूंचा सामना केला आणि १२० धावांसह तो खेळपट्टीवर कायम आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर शुबमन गिलने मयंकचे कौतुक केले. तो म्हणाला की, “ही एक अप्रतिम खेळी होती. त्याने पहिल्या सामन्यात जास्त धावा केल्या नाही. तो आला आणि दृढ खेळी खेळला. एका दिवसात २५० चेंडू खेळणे आणि नाबाद राहण्यात यशस्वी होणे एक महान गोष्ट आहे.”
गिल पुढे असे देखील म्हणाला की, “मी चांगली फलंदाजी करत होतो आणि माझ्याकडे मोठी धावसंख्य करण्याची संधी होती. मात्र, दुर्दैवाने मी चुकलो. या सहा सामन्यात मला शतक ठोकता आले नाही. हे माझ्या एकाग्रतेमुळे नाही झाले, तर काहीवेळी दुर्भाग्यशाली देखील राहिलो आहे. मला वाटते की शतकाला मोठ्या धावसंख्येत बदलणे माझी स्ट्रेंथ आहे.”
दरम्यान, न्यूझीलंडविरुद्ध मुंबईत खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा सामना सुरू होण्यासाठी उशीर झाला. कारण, सामन्यापूर्वीच्या पावसामुळे मैदान ओले झाले होते आणि ते ठीक करण्यासाठी वेळ लागला. भारताचे सलामीवीर शुबमन गिल आणि मयंक अगरवालने पहिल्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी पार पाडली. शुबमनने ७१ चेंडूंचा सामना केला आणि ४४ धावांचे योगदान दिले.
त्यानंतर अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेले चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली एकही धाव न करता एकापाठोपाठ बाद झाले. मात्र, मयंक अगरवाल मात्र दुसऱ्या दिशेने संयमी खेळी करत राहिला. याच कारणास्तव त्याला त्याचे शतक पूर्ण करता आले आणि दिवसाचा खेळ संपेपर्यंत तो खेळपट्टीवर कायम राहिला. पहिल्या दिवसाच खेळ संपेपर्यंत भारताने ४ विकेट्सच्या नुकसानावर २२१ धावा केल्या. रिद्धिमान साहा २५ धावा करून सध्या मयंक अगरवाल सोबत खेळपट्टीवर कायम आहे.
Comments are closed.