कर्णधार रोहितचे पुनरागमन ; टी-२०, वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

अखिल भारतीय निवड समितीने बुधवारी रात्री वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी १८ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. भारतीय संघ ६ फेब्रुवारीपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. तर टी-२० मालिका १६ फेब्रुवारीपासून कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवली जाईल. मर्यादित षटकांचा नियमित कर्णधार रोहित शर्माचे पुनरागमन झाले असून तो दोन्ही मालिकेचे नेतृत्व करताना दिसणार आहे. त्याचबरोबर माजी कर्णधार विराट कोहली या दोन्ही मालिकेत खेळणार आहे. अनुभवी लेगस्पिनर कुलदीप यादवचे वनडे संघात पुनरागमन झाले आहे. आयपीएलमध्ये खेळलेल्या रवी बिश्नोईचा टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतो.

जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. भारताने अलीकडेच दक्षिण आफ्रिकेत कसोटी आणि एकदिवसीय मालिका गमावली होती. त्या मालिकेत लोकेश राहुल कर्णधार होता, जो आता उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. केएल राहुल दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातून निवडीसाठी उपलब्ध असेल. गुडघ्याच्या दुखापतीमुळे रवींद्र जडेजा एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांसाठी उपलब्ध असणार नाही.

दरम्यान, अक्षर पटेल टी-२० मालिकेसाठी खेळणार आहे. करोना पॉझिटिव्ह आढळल्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडलेला वॉशिंग्टन सुंदरही या मालिकेसाठी खेळणार आहे. भुवनेश्वर कुमारला या महिन्याच्या सुरुवातीला दोन सामन्यांमध्ये खराब कामगिरीनंतर एकदिवसीय संघातून वगळण्यात आले होते. वरिष्ठ फिरकी गोलंदाज आर अश्विन दुखापतीमुळे वेस्ट इंडिज मालिकेसाठी खेळणार नाही.

भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान.

दरम्यान, भारत दौऱ्यासाठी वेस्ट इंडिजचाही एकदिवसीय आंतरराष्ट्रीय संघ जाहीर करण्यात आला आहे. क्रिकेट वेस्ट इंडिजच्या निवड समितीने वनडे मालिकेसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. वेगवान गोलंदाज केमार रोच आणि मधल्या फळीतील फलंदाज एनक्रुमाह बोनर संघात परतले आहेत, तर किरॉन पोलार्ड संघाचे नेतृत्व करणार आहेत.

वेस्ट इंडिज एकदिवसीय संघ: केरॉन पोलार्ड (कर्णधार), केमार रोच, एनक्रुमाह बोनर, ब्रँडन किंग, फॅबियन ऍलन, डॅरेन ब्राव्हो, शामराह ब्रूक्स, जेसन होल्डर, शाई होप, अक्वीलहोसेन, अल्झारी जोसेफ, निकोलस पूरन, रोमॅरियो शेफर्ड, ओडियन स्‍पॅथ हेडन वॉल्श ज्युनियर.

You might also like

Comments are closed.