भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात टी-२० मालिकेची बुधवारी (१७ नोव्हेंबर) सुरुवात झाली. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ५ विकेट्सने विजय मिळवला. सामन्यात भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन केले आणि संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विलियम्सन विश्रांतीवर होता. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज टिम साउदीने संघाचे नेतृत्व केले. तत्पूर्वी, पहिला टी२० सामना खेळण्यापूर्वी विलियम्सनने भारतीय संघाचे कौतुक केले आहे. त्याच्या मते भारतीय संघासोबत खेळणे सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक आहे.
न्यूझीलंड संघाच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून विलियम्सनने भारतीय संघाचे कौतुक केलेला व्हिडिओ शेअर केला आहे. तो या व्हिडिओमध्ये म्हटला की, “जेव्हा तुम्ही भारतासोबत खेळता, तेव्हा हे या खेळातील सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक असते. क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारात त्यांच्याकडे जी खोली आहे आणि प्रत्येक खेळाडूकडे गुणवत्ता आहे, ती अविश्वसनीय आहे. त्यामुळेच जागतिक क्रिकेटमध्ये त्यांचा दबदबा आहे.”
दरम्यान, न्यूझीलंडचा नियमित कर्णधार मागच्या बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेल्या व्यस्त वेळापत्रकानंतर या टी२० मालिकेदरम्यान विश्रांतीवर आहे. विलियम्सन टी२० मालिका संपल्यानंतर खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत न्यूझीलंड संघाचे नेतृत्व करताना दिसेल. विलियम्सनप्रमाणेच भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीही टी२० मालिकेदरम्यान विश्रांतीवर आहे. विराट कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात संघात पुनरागमन करेल. कसोटी मालिकेतील पहिला सामना २५ नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये सुरू होणार आहे.
बुधवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या टी२० सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ विकेट्सच्या नुकसानावर १६४ धावा केल्या. यामध्ये सलामीवीर मार्टिन गप्टिलने सर्वाधिक ७० आणि मार्क चॅपमनने ६३ धावा केल्या. न्यूझीलंडने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने ५ विकेट्सच्या नुकसानावर १९.४ षटकात विजय मिळवला. भारतासाठी सलामीवीर रोहित शर्मा (४२) आणि सूर्यकुमार यादव (६२) यांनी महत्वाची खेळी केली.