माद्रिद – दोन गोलच्या फरकाने पिछाडीवर पडल्यानंतरही तारांकित आघाडीपटू करीम बेंझेमाच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर रेयाल माद्रिदने थरारक लढतीत पॅरिस सेंट-जर्मेनवर सरशी साधत चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली.
किलियान एम्बापे, लिओनेल मेसी आणि नेयमार यांसारख्या आघाडीच्या खेळाडूंचा समावेश असलेल्या सेंट-जर्मेनने घरच्या मैदानावर झालेला या लढतीचा पहिल्या टप्प्यातील सामना १-० असा जिंकला होता. त्यामुळे बुधवारी मध्यरात्री दुसऱ्या टप्प्यातील सामना जिंकणे रेयालसाठी अनिवार्य होते. मात्र, घरच्या प्रेक्षकांसमोर रेयालला पूर्वार्धात चांगला खेळ करण्यात अपयश आले. पहिल्या टप्प्यातील सामन्याप्रमाणेच या सामन्यातही एम्बापेने (३९वे मिनिट) गोल करत सेंट-जर्मेनला १-० व एकूण लढतीत २-० अशी आघाडी मिळवून दिली.
मँचेस्टर सिटी उपांत्यपूर्व फेरीत
गतउपविजेत्या मँचेस्टर सिटीने यंदाही कामगिरीत सातत्य राखत चॅम्पियन्स लीगची उपांत्यपूर्व फेरी गाठली. स्पोर्टिग लिस्बनविरुद्धच्या लढतीचा पहिल्या टप्प्यातील सामना सिटीने ५-० असा जिंकला होता. तर बुधवारी मध्यरात्री झालेला दुसऱ्या टप्प्यातील सामना गोलशून्य बरोबरीत संपला.
उत्तरार्धात मात्र बेंझेमासह अनुभवी मध्यरक्षक लुका मॉड्रिच आणि युवा आघाडीपटू व्हिनिसिअस ज्युनियर यांसारख्या रेयालच्या खेळाडूंनी आपला खेळ उंचावला. ६१व्या मिनिटाला बेंझेमाने व्हिनिसिअसच्या पासवर वैयक्तिक आणि संघाचा पहिला गोल केला. मग बेंझेमानेच (७६ आणि ७८वे मि.) तीन मिनिटांत दोन गोल झळकावल्याने रेयालने एकूण लढतीत ३-२ने विजय मिळवला.