विराट कोहलीने भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. यावर बहुतांश क्रिकेटपटू आणि क्रिकेट तज्ज्ञ आश्चर्य व्यक्त करत आहेत. भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार रोहित शर्माचेनेही याविषयी आश्चर्य व्यक्त केले आहे. विराट कोहलीच्या कसोटी कर्णधारपदावरून पायउतार होण्याच्या निर्णयाने रोहित शर्मालाही धक्का बसला आहे. मात्र निर्यणावरुन आता काँग्रेसने बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्यावरच निशाणा साधला आहे. क्रिकेट बोर्डातील ‘शाहजाद्यांचं’ राजकारण फार घाण पातळीवर उतरलंय अशा खोचक शब्दात काँग्रेस आमदाराने बीसीसीआयच्या कारभारावर टीका केली आहे.
राज्याचे उर्जा मंत्री आणि काँग्रेसचे आमदार नितीन राऊत यांनी विराट कोहलीच्या तडकाफडकी राजीनाम्यानंतर ही टीका केली आहे. भारताच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार विराट कोहली जेव्हा राजीनामा देतो तेव्हा समजावं की क्रिकेट बोर्डातील “शाहजाद्यांचं” राजकारण फार घाण पातळीवर उतरलंय. मोहम्मद शमीच्या पाठीशी विराट पहाडासारखा उभा राहिला होता,” असे नितीन राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.