बॅडमिंटन स्पर्धा लक्ष्य उपांत्य फेरीत;

म्युएलहेम (जर्मनी) जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या लक्ष्य सेनने शुक्रवारी एच. एस. प्रणॉयचा पराभव करून जर्मन खुल्या बॅडिमटन स्पर्धेच्या (सुपर ३००) पुरुष एकेरी गटाची उपांत्य फेरी गाठली आहे. किदम्बी श्रीकांतला मात्र उपांत्यपूर्व फेरीत गाशा गुंडाळावा लागला.

 

जागतिक क्रमवारीत १४व्या क्रमांकावरील लक्ष्यने प्रणॉयला २१-१५, २१-१६ असे ३९ मिनिटांत नमवले. जानेवारी महिन्यात २० वर्षीय लक्ष्यने इंडिया खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. ‘सुपर ५००’ दर्जाच्या स्पर्धेतील त्याचे ते पहिले जेतेपद होते. त्या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतही लक्ष्यने प्रणॉयला हरवले होते. लक्ष्यची उपांत्य फेरीत ऑलिम्पिक विजेत्या व्हिक्टर अ‍ॅक्सेलसनशी गाठ पडणार आहे. डेन्मार्कच्या अ‍ॅक्सेलसनने श्रीकांतवर २१-१०, २३-२१ अशी दोन गेममध्ये मात केली.

लक्ष्यविरुद्ध पहिल्या गेममध्ये प्रणॉयने दमदार सुरुवात करीत ४-० अशी आघाडी घेतली. परंतु लक्ष्यने गुणांचा धडाका लावत १०-१० अशी बरोबरी साधली. त्यानंतर मात्र लक्ष्यने नियंत्रित खेळाच्या बळावर जिंकून १-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या गेममध्येही दोघांनी एकमेकांचा कडवा प्रतिकार केला. तरी लक्ष्यकडे विश्रांतीप्रसंगी ११-१० अशी आघाडी होती. मग लक्ष्यने सलग पाच गुण मिळवत नंतर दुसऱ्या गेमसह सामनाही खिशात घातला.

You might also like

Comments are closed.