ऑस्ट्रेलियात करोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असून शुक्रवारी १ लाख ३० हजार नव्या बाधितांची नोंद झाली. ऑस्ट्रेलियन स्पर्धा १७ जानेवारीपासून मेलबर्न येथे होणार असून व्हिक्टोरिया राज्यात ३५ हजार नवे करोनाबाधित आढळले. ‘‘हा काळ प्रत्येक ऑस्ट्रेलियन नागरिकासाठी अवघड असून त्यांना बरेच त्याग करावे लागले आहेत. त्यांचा विचार करूनच परकी नागरिकविषयक खात्याच्या मंत्र्यांनी हे पाऊल उचलले,’’ असे पंतप्रधान मॉरिसन म्हणाले. दुसऱ्यांदा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय झाल्यावर जोकोव्हिचच्या वकिलांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतली. हॉक यांचा निर्णय पूर्णपणे तर्कहीन आहे, असे वकील निकोलस वूड यांनी न्यायालयाला सांगितले. जोकोव्हिचमुळे ऑस्ट्रेलियात लसीकरणविरोधी भावना निर्माण होईल, असा हॉक यांचा दावा आहे. मात्र, त्यात तथ्य नसल्याचे वूड यांनी म्हटले. न्यायाधीश अँथनी केली यांनी हे प्रकरण फेडरल न्यायालयात पाठवले असून अंतिम सुनावणी रविवारी होऊ शकेल.
जोकोव्हिचला शनिवारी ऑस्ट्रेलियातील स्थानिक वेळेनुसार सकाळी ८ वाजता ऑस्ट्रेलियन सीमा सुरक्षा दलासमोर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागेल. त्यानंतर त्याला ताब्यात घेतले जाईल. मग सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत त्याला वकिलांच्या कार्यालयात जाण्याची परवानगी आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियन सीमा सुरक्षा दल त्याला पुन्हा ताब्यात घेईल. रविवारी होणाऱ्या परत पाठवणीच्या सुनावणीच्या वेळी तो वकिलांच्या कार्यालयात उपस्थित असेल.