ग्रीसचा स्टेफानोस त्सित्सिपास आणि रशियाचा डॅनिल मेदवेदेव या आघाडीच्या खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेला विजयी प्रारंभ केला. महिलांमध्ये बेलारूसच्या आर्यना सबालेंकालाही दुसरी फेरी गाठण्यात यश आले. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत चौथ्या मानांकित त्सित्सिपासने स्वीडनच्या मिकाइल यमेरला ६-२, ६-४, ६-३ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. दुसऱ्या मानांकित मेदवेदेवने स्विर्त्झंलॅडच्या हेन्री लाक्सोनेनवर ६-१, ६-४, ७-६ (७-३) अशी मात केली. गतविजेत्या नोव्हाक जोकोव्हिचच्या अनुपस्थितीत मेदवेदेवला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात असून दुसऱ्या फेरीत त्याच्यासमोर ऑस्ट्रेलियाच्या निक किरियॉसचे आव्हान असेल. किरियॉसने पहिल्या फेरीत ब्रिटनच्या लियाम ब्रोडीचा ६-४, ६-४, ६-३ असा पराभव केला. ब्रिटनचा अनुभवी खेळाडू अँडी मरेने ऑस्ट्रेलियन स्पर्धेत विजयी पुनरागमन करताना चुरशीच्या सामन्यात जॉर्जियाच्या निकोलोझ बासिलाश्विलीला ६-१, ३-६, ६-४, ६-७ (५-७), ६-४ असे पराभूत केले.
महिलांमध्ये दुसऱ्या मानांकित सबालेंकाने ऑस्ट्रेलियाच्या स्ट्रॉम सँडर्सचा ५-७, ६-३, ६-२ असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. मागील वर्षी अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा जिंकणाऱ्या ब्रिटनच्या एमा रॅडूकानूने पहिल्या फेरीत स्लोन स्टीफन्सला ६-०, २-६, ६-१ अशी धूळ चारली. स्पेनच्या गार्बिने मुगुरुझाने फ्रान्सच्या क्लारा बुरेलवर ६-३, ६-४ अशी, तर रोमेनियाच्या सिमोना हालेपने पोलंडच्या माग्दालेना फ्रेचवर ६-४, ६-३ अशी मात केली.
सानिया, बोपण्णाचे आज सामने
भारताचे दुहेरीतील अनुभवी खेळाडू सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा यांच्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील आव्हानाला बुधवारपासून सुरुवात होईल. पुरुष दुहेरीत बोपण्णा फ्रान्सच्या एडवार्ड रॉजर-व्हॅसेलिनच्या साथीने खेळणार असून पहिल्या फेरीत त्यांच्यापुढे ट्रीट ह्युइ आणि ख्रिस्तोफर रुंगकट यांचे आव्हान असेल. महिला दुहेरीत १२व्या मानांकित सानिया आणि नादिया किचेनॉक जोडीचा काया युवान आणि तमारा झिदान्सेक यांच्याशी सामना होणार आहे.