नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीय खेळाडूंना फायदा झाला आहे. या आठवड्याच्या क्रमवारीत दक्षिण आफ्रिका-भारत कसोटी मालिका आणि ऑस्ट्रेलिया-इंग्लंडमधील अॅशेस मालिकेचा समावेश करण्यात आला आहे. सांघिक क्रमवारीत, ऑस्ट्रेलियाला अॅशेस मालिका जिंकण्याचा जबरदस्त फायदा झाला आणि ते पहिल्या स्थानावर विराजमान झाले आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिली वनडे खेळवण्यात येत आहे. या सामन्यादरम्यान जाहीर झालेल्या क्रमवारीनुसार, विराट कोहली आणि ऋषभ पंत यांचा फलंदाजीत आणि जसप्रीत बुमराहला गोलंदाजीत फायदा झाला आहे.
ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन फलंदाजीत पहिल्या स्थानावर कायम आहे. नुकतेच भारताचे कसोटी कर्णधारपद सोडलेला विराट कोहली दोन स्थानांनी पुढे येत सातव्या आणि ऋषभ पंत १४व्या स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड सात स्थानांनी प्रगती करत करिअरमधील सर्वोत्तम पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.
याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा कीगन पीटरसन ३३व्या स्थानावर पोहोचला आहे. टेंबा बावुमा २८व्या स्थानावर तर रूसी व्हॅन डर डुसेन ४३व्या स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून ग्रीन ६६व्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा जॅक क्रॉली 9 ६८व्या स्थानावर पोहोचला आहे.
गोलंदाजी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स पहिल्या स्थानावर कायम आहे. भारतासाठी रवीचंद्रन अश्विन दुसऱ्या स्थानावर आहे, तर जसप्रीत बुमराह पहिल्या १० गोलंदाजांमध्ये परतला आहे. ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून ग्रीन ६२व्या स्थानावर तर स्कॉट बोलंड ४३व्या स्थानावर पोहोचला आहे. इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड १२व्या स्थानी आहे. दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा तिसर्या आणि लुंगी एनगिडी २१व्या स्थानावर पोहोचला आहे.