ऑस्ट्रेलियाचा थायलंडविरुद्ध अपेक्षित विजय;

मुंबई (प्रतिनिधी):  संभाव्य विजेत्या ऑस्ट्रेलियाने  एएफसी वुमन्स आशिया कप भारत २०२२ स्पर्धेत बी गटातील सर्व तीनही सामने जिंकत गटात अव्वल राहत दिमाखात बाद फेरीत प्रवेश केला. अंधेरी येथील मुंबई फुटबॉल अरेना स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात थायलंडचा कडवा प्रतिकार २-१ गालने  परतावून  ऑस्ट्रेलियाने  विजयी कूच केली. त्याचवेळी, या पराभवानंतरही थायलंड संघाची उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच झाली असून त्यांना रविवारी जपानविरुद्ध भिडावे लागेल. ऑस्ट्रेलिया कोरिया रिपब्लिक संघाविरुद्ध लढेल.
एमिली वॅन एगमंडने ३९व्या मिनीटाला गोल करत ऑस्ट्रेलियाला १-० गोलने आघाडीवर नेले. समंथा केरने ८० व्या मिनिटाला गोल करत संघाची आघाडी २-० गोल अशी केली. तसेच, थायलंडच्या निपावन पनयोसुकने (९०+३) एक संस्मरणीय गोल केला. पण, तोपर्यंत उशीर झाला होता. केरसह एली कार्पेंटर आणि कैटलिन फूर्ड यांना बेंचवर बसवत ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक टोनी गुस्तावसन यांनी फिलीपिन्सविरुद्ध ४-० गोलने  विजय मिळवलेल्या संघात मोठे बदल केले. युवा खेळाडूंंनी संधी मिळाल्यानंतर ऑस्ट्रेलियाची ओळख असलेला आक्रमक आणि वेगवान खेळ करत आपली क्षमता दाखवली. परंतु, त्याचवेळी थायलंडने भक्कम बचाव करताना पहिल्या ३० मिनिटांपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या आक्रमकांना रोखून धरण्यात यश मिळवले.
यानंतर अखेर सहा मिनिटांनी ऑस्ट्रेलियाने आपला जलवा दाखवला. एगमंडने स्पर्धेतील आपला पाचवा गोल नोंदवताना रेमी सीमसेनच्या पासवर शानदार गोल केला आणि संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. या नंतर ऑस्ट्रेलियाला लगेच दुसरा गोल करण्याची संधी होती, मात्र थायलंडच्या बचावपटूंनी त्यांचे आक्रमण यशस्वी होऊ दिले नाही.पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाने १-० अशी आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या सत्राची सुरुवात दोन्ही संघांसाठी काहीशी अडचणीची ठरली. ऑस्ट्रेलियाची युवा होली मॅकनामाराच्या गुडघ्याला दुखापत झाली, तर थायलंडकडून गोल नोंदवण्याची सुवर्ण संधी हुकली. थायलंडची गोलरक्षक सोप्रानो हिनेही शानदार बचाव करताना ऑस्ट्रेलियाच्या रेमी सीमसेनला पहिला आंतरराष्ट्रीय गोल करण्यापासून रोखले. परंतु अखेर बदली खेळाडू म्हणून मैदानात आलेल्या अनुभवी केरने ८०व्या मिनिटाला संघाचा दुसरा गोल करताना सिमोनच्या पासवर चेंडू गोलजाळ्यात ढकलला. यासह केरने स्पर्धेतील आपला सातवा वैयक्तिक गोलही नोंदवला.

अतिरिक्त वेळेच्या तिसºया  मिनिटाला बदली खेळाडू पनयोसुकने शानदार गोल करत थायलंडचा सामन्यातील पहिला गोल केला. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. थायलंडचा पराभव झाला असला, तरी त्यांनी स्पधेर्तील अखेरच्या आठ स्थानांमध्ये जागा मिळवण्यात यश मिळवले.

 

You might also like

Comments are closed.