औरंगाबाद- एम.एस.एम. बास्केटबॉल स्पोर्ट्स असोसिएशन, औरंगाबाद, व औरंगाबाद जिल्हा हौशी 3 ऑन 3 बास्केटबॉल संघटना, औरंगाबाद, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, 3 ऑन 3 बास्केटबॉल पुरुष गटांच्या स्पर्धेचे आयोजन दिनांक 15 ते 17 सप्टेंबर 2021 तारखेदरम्यान मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या बास्केटबॉल मैदानावर करण्यात आले. स्पर्धा शासनाने कोविडबाबत ठरवून दिलेल्या सर्व नियम व अटींचे अनुपालन करून आयोजिली जात आहे.
स्पर्धेच्या आज तिसर्या दिवशी सायंकाळच्या सत्रात घेण्यात आलेल्या अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये चित्तथरारक लढतीत औरंगाबाद चॅम्पियन संघाने एम.एस.एम.बास्केटबॉल संघाचा २१ विरुद्ध १८ बास्केटच्या फरकाने शेवटचा एक मिनिट शिल्लक असताना पराभव केला व स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या बास्केटबॉल मैदानावर प्रदीर्घ कालखंडानंतर बहुसंख्य प्रेक्षकांच्या उपस्थितीत बास्केटबॉलची प्रेक्षणीय लढत झाली यावेळी मैदानावर भरपूर प्रेक्षक वर्ग उपस्थित होता व सामन्याचा त्यांनी मनमुराद आनंद लुटला, अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये सामन्याच्या सुरुवातीच्या सत्रात दोन्ही संघानी तुल्यबळ लढत दिली व पहिल्या सत्रात सामना ११ विरुद्ध ११ बास्केटने बरोबरीत राहिला, यावेळी एम.एस.एम.संघातील आयुष्मान यांने अचूक ड्राइव्हईन करत बास्केटची नोंद केली व त्याला विपुल कड याने देखील त्याला साजेशा अशाच खेळाचे प्रदर्शन करीत अचूक बास्केट नोंदवले मात्र, तेवढ्याच ताकदीने औरंगाबाद चॅम्पियन तर्फे शुभम गवळी व ऋषिकेश दरक यांनी प्रतिकार करीत सामना बरोबरीत आणला, यावेळी मैदानावरील प्रेक्षकांची उत्कंठा वाढत गेली, तदनंदर सामन्याच्या दुसर्या सत्रात औरंगाबाद चॅम्पियन तर्फे अनिरुद्ध पांडे याने अचूक सहा बास्केटची नोंद केली व संघास भक्कम आघाडी मिळाली व त्याच वेळी सामना औरंगाबाद चॅम्पियन संघाकडे वळाल्याचे दिसून आले, त्यातच एम.एस.एम.संघातील आयुष्मान याने बॉडीप्रेशरने आत घुसून खेळण्याच्या नादात दोन वेळेस तोल जाऊन पाय घसरून मैदानावर पडला व त्यांचा खेळ थोडा संथ झाला, मात्र विपुल कड ने सलग पाच बास्केटची नोंद करीत सामन्यात पुन्हा रंगत आणली, मात्र त्याला पाहिजे तेवढी सुरज कदम व आयुष्मान कडून साथ लाभली नाही व १८ विरुद्ध १६ बास्केटची आघाडी असताना देखील एम.एस.एम संघाच्या संथ खेळाचा फायदा उचलत शुभम गवळी याने सलग तीन बास्केट व ऋषिकेश दरक याने सलग दोन बास्केटची नोंद करत सामना खिशात घातला व स्पर्धेचे विजेतेपद पटकावले, यावेळी मैदानावर एकच जल्लोष पाहायला मिळाला. एम.एस.एम. बास्केटबॉल संघास उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंनी खेळाडूवृत्तीचे प्रदर्शन केले व प्रेक्षकांची मने जिंकली.
तत्पूर्वी सकाळच्या सत्रात, घेण्यात आलेल्या उपांत्यफेरीच्या सामन्यामध्ये एम.एस.एम. संघाने अल्मायटी संघाचा २१ विरुद्ध ११ बास्केटने पराभव केला, विजयी संघातर्फे, विपुल कड, आयुष्मान सिंग, सुरज कदम व अभिषेक अंभोरे यांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन करीत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली, तर पराभूत अल्मायटी संघातर्फे विशाल बकाल, धवल मोरे, तुषार बलांडे, व अक्षय देवकर यांनी निकराची झुंज दिली.उपांत्यफेरीच्या दुसर्या सामन्यामध्ये औरंगाबाद चॅम्पियन अ संघाने औरगाबाद चॅम्पियन ब संघाचा २१ विरुद्ध १५ बास्केटने पराभव करीत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली , विजयी संघातर्फे अनिरुद्ध पांडे, ऋषिकेश दरक, व सत्यजित परदेशी, यांनी चौफेर कामगिरी करीत संघास विजय प्राप्त करून दिला, तर पराभूत संघातर्फे शुभम लाटे, रोहित परदेशी व जयराज तिवारी यांनी शेवटपर्यंत शर्थीची लढत दिली.
तदनंदर लगेचच स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त डॉ मकरंद जोशी, प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती बिजली आंबरे, संघटनेचे सचिव व आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल प्रशिक्षक गणेश कड, लंगडी संघटनेच्या सचिव मंदा कड, आयोजन समितीचे सह-सचिव सचिन तत्तापुरे, तांत्रीक समितीचे प्रमुख प्रशांत बुरांडे, विजय पिंपळे, संदीप क्षीरसागर, सचिन म्हस्के, विशाल बकाल, वैभव बकाल, संदीप ढंगारे, विश्वास कड, पूजा दुतोंडे आदींच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाला.
स्पर्धेदरम्यान एम.एस.एम.बास्केटबॉल तर्फे, इंटर हाऊस १२ वर्षाखालील मुलांच्या गटातून अंडर-द-रिंग-बास्केट विजयी कौस्तुभ श्रावगे, वन-बाउंस-शॉट मधून विजयी अंश जैन व ड्रीब्लिंग मधून विजयी ओम भालेराव तसेच मुलींच्या गटातून तिन्ही स्पर्धेतून अव्वलस्थानी राहिलेल्या रेणुका गोविंदवार हिला मोमेंटोज देऊन गौरविण्यात आले. विशाल बकाल, अनिस साहूजी, वरद देशपांडे, संतोष कंटोळे, पार्थ शेलार, पार्थ मुणगे, आदींनी पुढाकार घेतला.