खेळाडूंनी कोणतेही आर्थिक किंवा मानसिक दडपण न ठेवता निश्चित मनाने सर्वोत्तम कामगिरी करावी; अजित पवार

पुणे (प्रतिनिधी): खेळाडूंनी कोणतेही आर्थिक किंवा मानसिक दडपण न ठेवता निश्चित मनाने सर्वोत्तम कामगिरी करावी आणि आगामी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या सर्वसाधारण विजेतेपद मिळवून राज्याचा नावलौकिक उंचवावा, असे आवाहन महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित दादा पवार यांनी येथे महाराष्ट्राच्या खेळाडूंना मार्गदर्शन करताना केले.

आगामी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे महाराष्ट्राच्या विविध संघांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या संघांना महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनतर्फे श्री. पवार यांच्या हस्ते शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी राज्याचे नवनियुक्त क्रीडा आयुक्त  सुहास दिवसे हे उपस्थित होते.

खेळाडूंनी कोणतेही आर्थिक किंवा मानसिक दडपण न ठेवता निश्चित मनाने सर्वोत्तम कामगिरी करावी; अजित पवार

श्री. पवार यांनी पुढे सांगितले की, महाराष्ट्राच्या संघांकरिता सव्वाचार कोटी रुपयांची यापूर्वीच तरतूद करण्यात आली आहे. खेळाडूंना आणखी काही मदत लागली तरी त्यासाठी आम्ही शासनाकडे त्वरित संपर्क साधून हा निधीही मिळवून देऊ. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्यांना भरघोस बक्षीसे आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये संधी उपलब्ध केली जाणार आहे. त्यामुळे खेळाडूंनी आत्मविश्वासाने आणि सकारात्मक वृत्ती ठेवून विजेतेपद मिळवण्यावरच लक्ष केंद्रित करावे. येथील शिबिरात अव्वल दर्जाच्या सुविधा आणि प्रशिक्षकांची व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे महाराष्ट्राचे खेळाडू सर्वोच्च यश मिळवतील अशी मला खात्री आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतहून सोन्याचा खजिना लुटून आणला होता. आता महाराष्ट्राच्या खेळाडूंनी गुजरातमधून सोनेरी पदकांची लयलूट करावी, असे सांगून श्री. दिवसे म्हणाले, आगामी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी खेळाडूंना उत्तम दर्जाच्या सुविधा आणि प्रशिक्षण दिले जात आहे तसेच अन्य तज्ञांचे मार्गदर्शन देण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. हे मार्गदर्शन केवळ स्पर्धेपुरते न राहता त्यांना भावी जीवनासाठीही उपयुक्त होईल. खेळाडूंनी मैदानावर आणि मैदानाबाहेरही शिस्त आणि चांगले वर्तन ठेवावे मैदानावर खिलाडू वृत्तीने वागावे. फक्त या राष्ट्रीय स्पर्धांसाठी नव्हे तर आगामी काळात आहे राज्यातील खेळाडूंच्या विकासासाठी राज्य शासन व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन हे एकत्रितरित्या काम करणार आहेत.

या समारंभास राज्याचे क्रीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे अनेक क्रीडा मार्गदर्शक उपस्थित होते. या समारंभातच महाराष्ट्राच्या विविध संघांच्या कर्णधारांचा सत्कार करण्यात आला.

 

You might also like

Comments are closed.