सूरत- सानील शेट्टी, दिया चितळे, रवींद्र कोटियन, रीथ रीशा यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्र संघाला ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील टेबल टेनिस मध्ये सांघिक विभागात सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा आहे.या स्पर्धेतील सांघिक लढतींना आज येथील आंतरराष्ट्रीय इनडोअर स्टेडियम मध्ये प्रारंभ होत आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या टेबल टेनिसपटूंची कामगिरी नेहमीच उल्लेखनीय ठरली आहे. यंदाही तोच वारसा पुढे ठेवण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा आहे.
महाराष्ट्राच्या पुरूष संघाचे व्यवस्थापक श्रीराम कोनकर यांनी सांगितले की, शेट्टी व कोटियन यांच्याबरोबरच सिद्धेश पांडे, दीपित पाटील, रिगन अलबुकर्क हे देखील अव्वल दर्जाचे खेळाडू मानले जातात त्यामुळे आम्हाला चांगल्या यशाची खात्री आहे. या खेळाडूंनी भरपूर सराव केला आहे तसेच स्थानिक स्तरावरील स्पर्धांमध्येही त्यांची कामगिरी कौतुकास्पद झाली आहे. साखळी गटात आम्हाला पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश व कर्नाटक यांचे आव्हान असणार आहे.
महाराष्ट्राच्या महिला संघाच्या प्रशिक्षक ममता प्रभू यांनी सांगितले, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दिया चितळे व रीत रिशा यांना परदेशी खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी मिळाली आहे. या अनुभवाचा फायदा त्यांना येथील स्पर्धेत निश्चितपणे मिळेल. त्यांच्याबरोबरच अनन्या बसाक, स्वस्तिका घोष व श्रुती अमृते यांच्याकडूनही सर्वोत्तम कामगिरीची आशा आहे. साखळी गटात आम्हाला गुजरात, तेलंगणा व हरियाणा यांच्याबरोबर सामने खेळावयाचे आहेत. आमच्या खेळाडूंची तयारी चांगली झाली असल्यामुळे आम्हाला या संघांविरुद्ध विजय मिळवण्यात अडचणी येणार नाहीत.