स्पोर्ट्स पॅनोरमा | पुणे प्रतिनिधी
जपानमधील नागोया येथे पार पडलेल्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेतील गोळाफेक प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी करत देशाचे नाव उंचावले आहे. सांगलीचा ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता खेळाडू सचिन खिलारी याने विक्रमी कामगिरी नोंदवत सुवर्णपदक पटकावले, तर नांदेडच्या भाग्यश्री जाधव हिने रौप्यपदकावर आपले नाव कोरले.
एफ ४६ गोळाफेक प्रकारात सचिनने सलग दुसऱ्या वर्षी आशियाई पॅरा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. त्याने आपल्या पहिल्याच प्रयत्नात १५.७९ मीटरची विक्रमी फेक करत सुवर्णपदक निश्चित केले. विशेष म्हणजे या क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडूंचेच वर्चस्व पाहायला मिळाले. मोहम्मद यासरने रौप्य आणि प्रवीणकुमारने कांस्यपदक जिंकत पदकमंचावर भारताचा दबदबा निर्माण केला.
पॅरिस ऑलिम्पिकनंतर दुखापतीमुळे सचिनला जागतिक स्पर्धेतील पदकाला मुकावे लागले होते. मात्र, अमेरिकन प्रशिक्षक पॉल विल्सन यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने दमदार पुनरागमन केले. अमेरिकेतील सरावामुळेच कामगिरीत सुधारणा होऊन विक्रम नोंदवता आला, असे सचिनने स्पष्ट केले. पुण्याच्या बालेवाडीतही विल्सन यांनी त्याच्याकडून सराव करवून घेतला होता. महाराष्ट्र शासन आणि ओजीक्यूने पुरवलेल्या सुविधांमुळेच हे यश मिळाल्याचे सांगत, जागतिक स्पर्धा आणि ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणे हेच आपले ध्येय असल्याचे सचिनने नमूद केले.
दुसरीकडे, महिलांच्या एफ ३४ गोळाफेक प्रकारात भाग्यश्री जाधवने सलग दुसऱ्यांदा रौप्यपदकाची कमाई केली. तिने ८.१९ मीटरची वैयक्तिक सर्वोत्तम फेक नोंदवली आणि आपल्या दुसऱ्या प्रयत्नात हे पदक पक्के केले. याआधी चीनमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेतही भाग्यश्रीने रौप्यपदक पटकावले होते.
या यशानंतर प्रतिक्रिया देताना भाग्यश्री म्हणाली की, हे पदक मला आगामी ऑलिम्पिक पदक जिंकण्यासाठी नक्कीच नवी ऊर्जा देईल. तसेच, आपली आई पुष्पा जाधव यांच्या साक्षीने हे पदक जिंकल्याचा आनंद खूप मोठा असल्याची भावना तिने व्यक्त केली.










