आशिया चषकाचे जेतेपद टिकवण्यात भारतीय महिला संघ बुधवारी अपयशी ठरला. पिछाडीवरून दिमाखदार मुसंडीसह कोरियाने भारताला ३-२ अशी धूळ चारली. आता शुक्रवारी तिसऱ्या स्थानासाठी भारताला चीनविरुद्ध लढावे लागणार आहे.
भारताने सुरुवात चांगली केली. २८व्या मिनिटाला वंदना कटारियाने भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतरानंतर मात्र कोरियाचे वर्चस्व दिसून आले. कर्णधार ईनुबी चेऑन (३१व्या मिनिटाला), सेऊंग जू ली (४५व्या) आणि हायेजिन चो (४७व्या) यांनी कोरियाला ३-१ अशी आघाडी मिळवून दिली. सामना संपायला सहा मिनिटे शिल्लक असताना लालरेमसियामिन वंदनाच्या साहाय्याने भारताच्या खात्यावर दुसऱ्या गोलची नोंद केली. परंतु त्यानंतर भारताला तिसरा गोल साकारता आला नाही.