अग्रमानांकित अॅश्ले बार्टी आणि २७वी मानांकित डॅनिल कॉलिन्स यांनी गुरुवारी दिमाखात ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. सातवी मानांकित इगा श्वीऑनटेक आणि मॅडिसन कीज यांचे मात्र जेतेपदाचे स्वप्न भंगले. शनिवारी बार्टी-कॉलिन्स यांच्यात जेतेपदाची लढत खेळवण्यात येईल.
जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान असणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या बार्टीने अमेरिकेच्या बिगरमानांकित कीजवर अवघ्या एका तासात वर्चस्व मिळवले. रॉड लेव्हर एरिना येथे झालेल्या पहिल्या उपांत्य लढतीत २५ वर्षीय बार्टीने कीजचा ६-१, ६-३ असा सरळ दोन सेटमध्ये फडशा पाडला.
आतापर्यंत स्पर्धेत एकही सेट न गमावणाऱ्या बार्टीला शनिवारी इतिहास रचण्याची संधी आहे. तब्बल ४४ वर्षांनंतर ही स्पर्धा जिंकणारी बार्टी पहिली ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरू शकते. १९७८मध्ये ख्रिस्टीन ओनील यांनी हा पराक्रम केला होता. याव्यतिरिक्त, ४२ वर्षांनी प्रथमच एखाद्या ऑस्ट्रेलियन महिलेने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. १९८०मध्ये वेंडे टर्नबुल यांनी अशी कामगिरी केली होती. त्यामुळे दोन ग्रँडस्लॅम जेतेपद नावावर असणारी बार्टी (फ्रेंच २०१९, विम्बल्डन २०२१) घरच्या प्रेक्षकांसमोर ऐतिहासिक जेतेपद मिळवण्यासाठी उत्सुक असेल.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात अमेरिकेच्या कॉलिन्सने पोलंडच्या श्वीऑनटेकवर धक्कादायक विजयाची नोंद केली. एक तास १८ मिनिटे लांबलेल्या या लढतीत कॉलिन्सने २०२०च्या फ्रेंच विजेत्या श्वीऑनटेकचा ६-४, ६-१ असा सहज धुव्वा उडवून प्रथमच एखाद्या ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. कॉलिन्सने यापूर्वी २०१९मध्ये ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. यंदा तिने एक पाऊल पुढे टाकून पहिल्यावहिल्या ग्रँडस्लॅमच्या दिशेने कूच केली आहे.
नदाल-बेरेट्टिनी, त्सित्सिपास-मेदवेदेव आज झुंजणार –
पुरुष एकेरीच्या पहिल्या उपांत्य सामन्यांत स्पेनचा राफेल नदाल आणि इटलीचा मॅटेओ बेरेट्टिनी आमनेसामने येतील. दुसऱ्या उपांत्य लढतीत ग्रीसचा स्टेफानोस त्सित्सिपास आणि रशियाचा डॅनिल मेदवेदेव एकमेकांविरुद्ध उभे ठाकतील.
ऑस्ट्रेलियातील टेनिसप्रेमींच्या अपेक्षांची पूर्तता केल्याचा आनंद आहे. परंतु मायदेशात ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे अंतिम फेरीतील प्रतिस्पर्धी कोणीही असली तरी या वेळी मी ही संधी निसटू देणार नाही. – अॅश्ले बार्टी
स्पर्धेला जेव्हा प्रारंभ झाला तेव्हा मी अंतिम फेरीपर्यंत मजल मारू शकेन, याचा विचारही केला नव्हता. ऑस्ट्रेलियन खेळाडूविरुद्ध त्याच्याच भूमीत जेतेपदाची लढत खेळणे अविस्मरणीय अनुभव असेल.
– डॅनिल कॉलिन्स