स्पोर्ट्स पॅनोरमा | वृतसंस्था
ओडिशाच्या भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) महिला खेळाडूंनी शानदार कामगिरी करत देशाचे नाव उंचावले आहे. २५ ते २७ नोव्हेंबरदरम्यान आयोजित अंडर-२३ बिम्सटेक ॲथलेटिक्स स्पर्धा-२०२६ मध्ये बीएसएफच्या दोन महिला खेळाडूंनी पदके जिंकून आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवली आहे.
भारतीय अंडर-२३ ॲथलेटिक्स संघाचे प्रतिनिधित्व करताना कॉन्स्टेबल आयशा खानम हिने महिलांच्या ४x४०० मीटर रिले संघाची सदस्य म्हणून खेळताना सुवर्णपदक पटकावले आहे. तर, दुसरीकडे कॉन्स्टेबल प्रतीक्षा यादव हिने ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत उत्कृष्ट प्रदर्शन करत रौप्यपदकावर आपले नाव कोरले.
एकूण ६ देशांच्या खेळाडूंनी सहभाग घेतलेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बीएसएफच्या या दोन्ही महिला खेळाडूंनी मिळवलेले यश हे भारतीय ॲथलेटिक्ससाठी अत्यंत उत्साहवर्धक मानले जात आहे. सीमेचे रक्षण करणारे आपले जवान क्रीडांगणावरही देशाची शान वाढवण्याची ताकद ठेवतात, हे या यशाने दाखवून दिले आहे.
बीएसएफचे महासंचालक आणि संपूर्ण सीमा प्रहरी परिवाराने आयशा खानम आणि प्रतीक्षा यादव यांना त्यांच्या या गौरवशाली कामगिरीबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, त्यांच्या उज्ज्वल भविष्यातील वाटचालीसाठी आणि आगामी स्पर्धांमधील आणखी यशस्वी कामगिरीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या दलाच्या मुली जेव्हा क्रीडा क्षेत्रातही तिरंगा फडकवतात, तेव्हा संपूर्ण देशाला अभिमान वाटतो. आयशा आणि प्रतीक्षा यांचे हे यश युवा खेळाडूंसाठी एक मोठा प्रेरणादायी संदेश आहे.





