स्पोर्ट्स पॅनोरमा | वृतसंस्था
इंग्लंड क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अॅलिस्टर कुक यांनी शनिवारी १५ वर्षीय भारतीय फलंदाज वैभव सूर्यवंशी याचे मोठे कौतुक केले आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL) आणि इतर स्पर्धांमध्ये आपल्या आक्रमक फलंदाजीने खळबळ माजवणाऱ्या वैभवने भारतीय कसोटी संघातही खेळावे, अशी इच्छा कुक यांनी व्यक्त केली आहे.
गुरुग्राम येथे आगमन झाल्यानंतर क्वीन एलिझाबेथ स्कूलच्या कार्यक्रमादरम्यान पीटीआय (PTI) शी बोलताना कुक यांनी वैभवच्या फलंदाजीवर आणि त्याच्या भविष्यावर भाष्य केले. “मला वाटते की सूर्यवंशी हा एक अद्वितीय खेळाडू आहे. मी अशी फटकेबाजी यापूर्वी कधीही पाहिलेली नाही. त्याच्या फटकेबाजीतील सातत्य आणि चेंडूवर प्रतिक्रिया देत षटकार मारण्याची क्षमता पाहता तो हे सातत्याने करू शकतो,” असे माजी इंग्लंड कर्णधाराने म्हटले.
आयपीएलमध्ये अनेक विक्रम मोडीत काढणाऱ्या वैभवबद्दल आपण आणखी १० वर्षांनंतरही चर्चा करत असू, अशी आशा कुक यांनी व्यक्त केली. “माझी मोठी आशा आहे की आपण १० वर्षांनंतरही त्याच्याबद्दल बोलत असू, कारण त्याच्यावर असणारा प्रचंड दबाव आणि अपेक्षा पाहता हे खूप मोठे काम असेल. त्याने टी-२० विश्वात धुमाकूळ घातला आहे. आयपीएल या जगातील सर्वात मोठ्या फ्रेंचायझी स्पर्धेतील त्याची कामगिरी अविश्वसनीय आहे,” असे ते म्हणाले.
नुकतेच वैभव सूर्यवंशी याने ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये भारत अ संघाकडून खेळताना संयुक्त अरब अमिराती (UAE) विरुद्ध विक्रमी द्विशतक झळकावले होते. या द्विशतकाने तो एकदिवसीय क्रिकेटमध्येही धावा करू शकतो हे सिद्ध केले आहे.
अनेक माजी क्रिकेटपटूंप्रमाणेच कुक यांनाही वैभवला कसोटी क्रिकेटमध्ये पाहण्याची इच्छा आहे. “त्याच्याकडे अशी गुणवत्ता आहे जी मी यापूर्वी कधीही पाहिली नाही. मला आशा आहे की तो हे सर्व हाताळू शकेल आणि कसोटी क्रिकेटमध्येही तो स्वतःला सिद्ध करण्याचे आव्हान स्वीकारेल. कसोटी क्रिकेटला अशा खेळाडूंची गरज आहे जे प्रयत्न करण्यास तयार आहेत. कदाचित तो यशस्वी होणार नाही आणि तेही ठीक आहे,” असे कुक म्हणाले.
तो पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटवर वर्चस्व गाजवतो, परंतु तो कसोटी क्रिकेट खेळण्याचे आव्हानही स्वीकारेल अशी मला आशा आहे. क्रिकेटला एखाद्या खेळाडूने प्रेरित करण्याची गरज असते आणि प्रत्येक पिढीला एका प्रेरणादायी खेळाडूची आवश्यकता असते, असेही त्यांनी नमूद केले.
जर सूर्यवंशीने वयाच्या २० व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्येही धुमाकूळ घातला, तर लोक म्हणतील की आम्हाला पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटबरोबरच लाल चेंडूच्या क्रिकेटमध्येही असेच करायचे आहे, असा निष्कर्ष कुक यांनी काढला. वैभवने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये अशी कामगिरी केल्यास कसोटी क्रिकेटला मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.





