स्पोर्ट्स पॅनोरमा | प्रतिनिधी
क्रिकेटच्या नियमांवर नियंत्रण ठेवणाऱ्या मेरीलेबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) फलंदाजांना बाद देण्याच्या एका महत्त्वपूर्ण नियमात मोठा बदल केला आहे. नव्या बदलानुसार, जर एखाद्या फलंदाजाने फटका मारल्यानंतर चेंडू नॉन-स्ट्रायकर एन्डच्या स्टंपला लागून पुन्हा फलंदाजीच्या टोकाकडे घरंगळत आला आणि त्याने तिथल्या यष्टी उडवल्या, तर त्या फलंदाजाला आता बाद (नॉटआऊट) दिले जाणार नाही.
एमसीसीचे अध्यक्ष फ्रेझर स्टीवर्ट यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून या नव्या नियमाची सविस्तर माहिती दिली. त्यांनी एका ज्युनियर काउंटी सामन्यातील घटनेचा दाखला दिला. त्या सामन्यात फलंदाजाने मारलेला फटका आधी नॉन-स्ट्रायकर टोकाच्या यष्टींवर आदळला आणि तिथून घरंगळत जाऊन त्याने स्ट्रायकर टोकाच्या यष्टी उडवल्या होत्या. जुन्या नियमांनुसार त्यावेळी त्या फलंदाजाला बाद घोषित करण्यात आले होते. मात्र, आता नव्या नियमानुसार अशा प्रकारे फलंदाज बाद मानला जाणार नाही.
या मुख्य बदलासोबतच एमसीसीने १ ऑक्टोबरपासून क्रिकेटच्या इतरही काही नियमांमध्ये सुधारणा केल्या आहेत. या नव्या नियमांनुसार, जर एखादा फलंदाज पुढचा चेंडू खेळण्यासाठी जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करत असेल, तर त्याला दुसरी ताकीद दिली जाईल. मात्र, त्याने तिसऱ्यांदा हीच कृती केल्यास क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला ५ दंड धावा (पेनल्टी रन्स) बहाल केल्या जातील.
तसेच, आता दोन्ही संघांच्या कर्णधारांची सहमती असल्यास दिवसा खेळवल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यांमध्ये गुलाबी चेंडूचा वापर करण्याची मुभा असेल. यासोबतच, दिवसाच्या खेळातील शेवटच्या षटकात जर एखादा फलंदाज बाद झाला, तर लगेचच तो सामना किंवा दिवसाचा खेळ थांबवला जाणार नाही, तर नवीन फलंदाजाला क्रीजवर बोलावले जाईल. क्रिकेटमध्ये अशा घटना दुर्मिळ असल्या तरी तांत्रिकदृष्ट्या निर्माण होणारे वाद आणि संभ्रम या नव्या बदलांमुळे दूर होतील आणि नियमांमध्ये अधिक स्पष्टता येईल, असा विश्वास एमसीसीने व्यक्त केला आहे.








