सूरत- उत्कंठापूर्ण लढतीत महाराष्ट्राला महिलांच्या अंतिम फेरीत पश्चिम बंगाल विरुद्ध १-३ अशी हार स्वीकारली आणि उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या गटात महाराष्ट्राला उपांत्य फेरीतच पराभव स्वीकारावा लागला त्यामुळे त्यांना ब्रॉंझपदक मिळाले.
महिलांच्या अंतिम लढतीत पश्चिम बंगालच्या ऐहिका मुखर्जी हिने महाराष्ट्राच्या स्वस्तिका घोष हिचा ११-३,११-५,११-३ असा दणदणीत पराभव केला. मात्र दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्राच्या रीथ रिशा टेनिसन हिने सुतीर्था मुखर्जी हिला ११-९,१३-११,११-९ असे पराभूत करीत लढतीत १-१ अशी बरोबरी केली. दिया चितळे या महाराष्ट्राच्या खेळाडूला बंगालची ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय खेळाडू मौमा दास हिने ६-११,१६-१४,१०-१२,१४-१२,११-६ असे चिवट झुंजीनंतर पराभूत केले आणि बंगाल संघास २-१ अशी आघाडी मिळवून दिली. परतीच्या एकेरीत घोष हिला सुतीर्था हिच्याविरुद्ध ४-११,१३-११ ,८-११, १२-१०,६-११ असा पराभव स्वीकारावा लागला. बंगालने ३-१ अशा फरकाने लढत जिंकून सुवर्णपदकावर नाव कोरले.
पुरुषांच्या उपांत्य फेरीत दिल्लीने महाराष्ट्राला ३-२ अशा गेम्सने हरवले. या लढतीमधील एकेरीच्या पहिल्या सामन्यात महाराष्ट्राच्या दीपित पाटील याला सुधांशू ग्रोवर याने ११-८,९-११,११-७,११-७ असे नमविले पाठोपाठ सानील शेट्टी याला पायस जैन याच्या विरुद्ध चा सामना ११-६,८-११, १२-१०,५-११,७-११ असा गमवावा लागला.

महाराष्ट्राच्या सिद्धेश पांडे याने यशांश मलिक याचा ४-११,११-९,११-९,११-९ असा पराभव करीत उत्कंठा निर्माण केली. सिद्धेश याचा सहकारी शेट्टी याने ग्रोवर याच्यावर ८-११, ११-६,११-९,७-११,१७-१५ असा रोमहर्षक विजय नोंदविला. त्यामुळे लढतीत २-२ अशी बरोबरी झाली. निर्णायक सामन्यात महाराष्ट्राच्या पाटील याला दिल्लीच्या पायस जैन याने ११-९,११-६,१२-१० असे पराभूत करीत आपल्या संघास ३-२ असा विजय मिळवून दिला.
