१२ फुटबॉलपटू करोनाबाधित झाल्याने चायनीज तैपेईविरुद्धचा सामना रद्द –
भारतीय संघातील १२ खेळाडूंना करोनाची लागण झाल्यामुळे ‘एएफसी’ महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेमधील रविवारी होणारा चायनीज तैपेईविरुद्धचा सामना रद्द करण्यात आला. यजमान भारताला या सामन्यात खेळता न आल्याने त्यांचे या स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले.
भारतीय संघातील अनेक खेळाडूंना करोनाची लागण झाली आहे. याचप्रमाणे दोन खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. अ-गटातील चायनीज तैपेईविरुद्धचा सामना खेळण्यासाठी आवश्यक किमान १३ तंदुरुस्त खेळाडूंच्या निकषाची पूर्तता करण्यात भारत अपयशी ठरला,’’ असे आशियाई फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) पत्रकात म्हटले आहे. तसेच ‘एएफसी’च्या नियमांतील ४.१ कलमानुसार, पुरेसे खेळाडू नसल्याने एखाद्या संघाला सामन्यात खेळता न आल्यास त्यांनी त्या स्पर्धेतून माघार घेतल्याचे ग्राह्य धरले जाते. त्यामुळे भारतीय संघाला फक्त एका सामन्यानंतरच आशियाई चषकातून बाहेर व्हावे लागले.
भारताला सलामीच्या लढतीत इराणने गोलशून्य बरोबरीत रोखले. त्यानंतर २१ जानेवारीला खेळाडूंची आरटी-पीसीआर करोना चाचणी केली आणि याचे निकाल रविवारी सकाळी आले. यात भारताच्या १२ खेळाडूंना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तैपेईविरुद्धच्या सामन्यासाठी किमान १३ तंदुरुस्त खेळाडू खेळवण्यात भारतीय संघ अपयशी ठरला. भारताचा पुढील सामना बुधवारी चीनविरुद्ध रंगणार होता. मात्र, केवळ तीन दिवसांच्या कालावधीत करोनातून बरे होणे शक्य नसल्याने भारतीय संघाचे सामने पुन्हा आयोजित करण्याचा संयोजकांकडून विचार करण्यात आला नाही.
खेळाडूंसह सर्वाचीच निराशा -पटेल
करोनामुळे महिलांच्या आशियाई चषकातील आव्हान संपुष्टात आल्याने भारतीय संघातील खेळाडू निराश असल्याचे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी सांगितले. ‘‘भारतीय संघातील खेळाडू खूप दु:खी आहेत. त्यांनी पहिल्या सामन्यात चांगला खेळ केला होता. ज्या परिस्थितीत भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले, त्यामुळे खेळाडू, महासंघाचे पदाधिकारी आणि संपूर्ण देशच निराश आहे,’’ असे पटेल म्हणाले. तसेच सर्वोत्तम जैव-सुरक्षा परिघातही करोनाचा शिरकाव होऊ शकतो. त्यामुळे कोणावरही टीका करणे योग्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.