औरंगाबाद ऑगस्ट १९८५ रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळ खडकेश्वर औरंगाबाद येथे श्री. सुधीरदादा जोशी यांनी जिम्नॅस्टिक्स या पाश्चिमात्य खेळाच्या प्रशिक्षणाला सुरुवात केली. या घटनेला ५ऑगस्ट २०२१ रोजी ३६ वर्षे पूर्ण झाली. या प्रित्यर्थ औरंगाबाद जिल्हा जिम्नास्टिक्स संघटनेने व पूर्णवाद स्पोर्ट्स अँड हेल्थ प्रमोशन ऍकॅडमीच्या वतीने वर्धापन दिन व कै.सुधीरदादा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. कै.सुधीरदादा जोशी यांच्या व्याख्यानमालेचे यावर्षीचे हे सहावे वर्ष होते.
डॉ. मकरंद जोशी यांनी छत्तीस वर्ष औरंगाबाद मध्ये जिम्नॅस्टिक्स कशा पद्धतीने रुजले यामध्ये मराठवाडा सांस्कृतिक मंडळाची भूमिका, कै.सुधीरदादा यांनी केलेले समर्पित व निस्वार्थी प्रयत्न, दादांना मदतीस धावून आलेले प्रशिक्षक कै. जगदीश राजेशिर्के, विकास आदक, दीपक शिर्के ,राजेंद्र पठानिया, पुरुषोत्तम दारव्हणकर इ. व्यक्तींनी केलेली मदत, तसेच येथील तत्कालीन खासदार व औरंगाबाद महानगरपालिका यांनी अनेक वर्ष महापौर चषक स्पर्धा आयोजित करून जिम्नास्टिक्स खेळायला पुढे आणण्यास केलेली मदत उद्धृत केली. याशिवाय जोशी यांनी आपल्या प्रशिक्षकाच्या भूमिकेची आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय पंच व त्यांना मिळालेले मानांकन यासंदर्भातही अनेक प्रसंग सर्वांसमोर ठेवून आपल्या मधुर वाणीने मंत्रमुग्ध केले. कै.सुधीरदादा यांच्या मार्गावर मार्गक्रमण करत असताना काळ सापेक्ष अनेक गोष्टी ज्या जिम्नास्टिक्स खेळाच्या विकासासाठी आवश्यक आहेत, त्या औरंगाबाद जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटना कशा पद्धतीने भविष्यात कार्य करणार आहे, याचाही ऊहापोह डॉ. जोशी यांनी आपल्या मुलाखती दरम्यान केला. शेवटी औरंगाबाद शहरामध्ये दोन वर्षांत जिम्नॅस्टिक्सचे अद्यावत व सर्व सुरक्षा उपकरणासहित सज्ज असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जिम्नॅस्टिक्स स्टेडियम लवकरच उभे करण्याची व येथील खेळाडू ऑलम्पिकपर्यंत पोहोचतील अशी मनीषा ही त्यांनी बोलून दाखवली. उपस्थितांनी ही यावेळी त्यांना आपल्या अनेक शंका, प्रश्न विचारून माहिती घेतली. त्यांची मुलाखत ऋग्वेद जोशी यांनी घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.राहुल श्रीरामवार यांनी तर प्रास्ताविक डॉ. सागर कुलकर्णी, कोषाध्यक्ष औरंगाबाद जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटना यांनी केले. आभार प्रदर्शन श्री.हर्षल मोगरे यांनी केली.
यावेळी औरंगाबाद शहरातील जिम्नॅस्टिक्सचे आंतरराष्ट्रीय खेळाडू व शिवछत्रपती पुरस्कारार्थी सर्वश्री डॉ. विशाल देशपांडे, डॉ. रणजीत पवार , राहुल तांदळे ,राहुल श्रीरामवार, महेश सोनी ,आदित्य सामग , मयूर बोंढारे ,सुरज ताकसांडे ,संदीप गायकवाड, सौरभ भालेराव,संतोष साबळे,डॉ.शेखर कोठुळे,आनंद थोरात,ईशा महाजन, साक्षी लड्डा, विजय इंगळे सचिन कापसे, तसेच राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू, भावी जिम्नॅस्टिक्सपटू पालक व संघटनेचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.