नवी दिल्ली : भारतीय क्रीडा विश्वातील कामगिरीसाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव आता बदलण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली आहे. हा पुरस्कार आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखला जाईल. त्यांनी ट्विटरव्दारे हि घोषणा केली आहे.
भारतातील अनेक नागरिकांनी खेलरत्न पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद यांच्या नावानं असावं, असं म्हटलं होतं. मी त्यांच्या मतांसाठी आभार मानतो, असं म्हटलं आहे. त्यांच्या भावनांचा आदर करत खेलरत्न पुरस्कार आतापासून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार नावानं ओळखला जाईल, असं म्हटलं. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचं नाव बदलून मेजर ध्यानचंद यांचं नाव पुरस्काराला देण्यात आलं आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून यावर आक्षेप घेतला जात आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयावरून खोचक टीका केली आहे. “मला तर वाटलं होतं की ते राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव देखील बदलून नरेंद्र मोदी खेलरत्न पुरस्कार ठेवतील. यालाच इंग्रजीमध्ये Megalomania म्हणतात!” असं देखील त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
दिग्विजय सिंह यांनी यासंदर्भात ट्वीटमध्ये मोदींच्या या घोषणेवर आश्चर्य व्यक्त केलं आहे. “आधी आहमदाबादच्या सरदार पटेल क्रिकेट स्टेडियमचं नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम केलं. मला आश्चर्य वाटलं, जेव्हा त्यांनी मेजर ध्यानचंद जीच्या नावे राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव ठेवलं”, असं दिग्विजय सिंह यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.