मुंबई : आयपीएलच्या १४व्या हंगामासाठीच्या लिलावाची तयारी सुरू झाली आहे. भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर अनेकदा आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाच्या सराव सत्रात दिसतो. अर्जुन मुंबईसाठी नेट गोलंदाज म्हणून असतो. भारतीय संघासाठी त्याने नेट गोलंदाजी केली आहे. आता आयपीएल २०२१ मध्ये अर्जुन खेळताना दिसणार आहे.
यंदाच्या आयपीएलच्या लिलावात मुख्य आकर्षणांपैकी एक होता सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर, कोणता संघ त्याच्यासाठी बोली लावणार यावरुन सोशल मीडियात आधीच अनेक तर्क लढवले जात होते. अखेर सचिन तेंडूलकरप्रमाणे त्याचा मुलगाही मुंबई इंडियन्ससाठीच खेळणार आहे.
अर्जुन तेंडूलकरची बेस प्राईज 20 लाख रुपये ठेवण्यात आली होती, मुंबई इंडियन्सनं त्याला त्याच्या बेस प्राईजवरच विकत घेतलं. अर्थात मुंबईकडून खेळण्यासाठी त्याला 20 लाख रुपये मिळणार आहेत. सोशल मीडियावर यावरुन आता चर्चांना एकच उधाण आलं आहे. यावर मुंबई संघाचे मालक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी यांनी अर्जुनच्या निवडीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अर्जुनकडे गुणवत्ता असून तो डावखुरा जलदगती गोलंदाज आणि फलंदाजही आहे. जगात असे फार कमी क्रिकेटपटू आहेत. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे अन्य युवा खेळाडूंप्रमाणे त्याची प्रगती होत गेली आहे. मुंबई इंडियन्स त्याला आणखी सहकार्य करेल अर्जुनलाही त्यासाठी मेहनत घ्यावी लागेल, असं आकाश अंबानी यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे.
ज्या प्रकारचं वातावरण मुंबई इंडियन्सच्या कुटुंबात आहे त्याचा अर्जुनला फायदाच होईल. अन्य युवा खेळाडूंप्रमाणे आगामी काळात अर्जुनही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करेल, अशी आशा आहे, असंही आकाश अंबानी यांनी म्हटलं आहे. मात्र सोशल मीडियावर सध्या सचिनचा मुलगा अर्जुनला संघात सामिल करताना वशिलेबाजीवरून ट्रोल केलं जात आहे.