कर्णधार यश धूलसह प्रमुख खेळाडू परतल्यामुळे युवा विश्वचषक (१९ वर्षांखालील) क्रिकेट स्पर्धेत शनिवारी बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात भारताला दोन वर्षांपूर्वीच्या पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे. बांगलादेशने २०२० मध्ये झालेल्या युवा विश्वचषकातील अंतिम फेरीत भारतालाच नमवून जेतेपदावर नाव कोरले होते.
आयर्लंडविरुद्ध झालेल्या दुसऱ्या साखळी सामन्यापूर्वी भारताच्या तब्बल सहा खेळाडूंना करोनाची लागण झाली. यामध्ये धूल, उपकर्णधार शेख रशीद, वासू वत्स, सिद्धार्थ यादव, आराध्य यादव आणि मानव प्रकाश यांचा समावेश होता. आता या सहा खेळाडूंचे विलगीकरण पूर्ण झाले असून त्यांनी शुक्रवारी केलेल्या करोना चाचणीचा अहवालही नकारात्मक आला आहे. त्यामुळे निश्चितच भारताचे पारडे या वेळी जड मानले जात आहे.
परंतु धूलच्या अनुपस्थितीत भारताचे नेतृत्व करणाऱ्या निशांत सिंधूला मात्र करोना झाल्याने तो या लढतीला मुकणार आहे. निशांतच्या नेतृत्वाखाली भारताने आयर्लंड आणि युगांडाला धूळ चारून दिमाखात उपांत्यपूर्व फेरीतील स्थान पक्के केले होते.
वेळ : सायंकाळी ६.३० वा.
’थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २, सिलेक्ट २ (संबंधित एचडी वाहिन्यांवर)