माऊंट माँगानुई –भारतीय महिला संघाने जोरदार कामगिरी केली आहे. जेतेपदाचा दावेदार भारतीय संघाने रविवारी महिलांच्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विजयारंभ केला. सलामीवीर स्मृती मानधना, स्नेह राणा आणि पूजा वस्त्राकर यांच्या अर्धशतकांनंतर डावखुरी फिरकीपटू राजेश्वरी गायकवाडने केलेल्या प्रभावी माऱ्याच्या जोरावर भारताने सलामीच्या लढतीत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा १०७ धावांनी धुव्वा उडवला.
तत्पूर्वी, रविवारी झालेल्या सामन्यात भारताची कर्णधार मिताली राजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताची युवा सलामीवीर शफाली वर्मा खातेही न उघडता बाद झाली. मानधना (७५ चेंडूंत ५२ धावा) आणि दीप्ती शर्मा (५७ चेंडूंत ४०) या डावखुऱ्या फलंदाजांच्या जोडीने दुसऱ्या गडय़ासाठी ९२ धावांची भागीदारी रचत भारताला सावरले. मात्र, या दोघींसह कर्णधार मिताली राज (९), हरमनप्रीत कौर (५) आणि रिचा घोष (१) झटपट माघारी परतल्याने भारताची २ बाद ९६ वरून ६ बाद ११४ अशी स्थिती झाली. मग २२ वर्षीय वस्त्राकर (५९ चेंडूंत ६७) आणि राणा (४८ चेंडूंत नाबाद ५३) यांनी ११२ धावांची विक्रमी भागीदारी रचत भारताच्या डावाला आकार दिला. ही महिला एकदिवसीय क्रिकेटमधील सातव्या गडय़ासाठीची सर्वोत्तम भागीदारी ठरली. त्यामुळे भारताने ५० षटकांत ७ बाद २४४ अशी धावसंख्या उभारली.
माऊंट माँगानुई येथील बे ओव्हलवर झालेल्या या सामन्यात भारताने केलेल्या २४५ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ १३७ धावांतच गारद झाला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानवरील हा भारतीय महिला संघाचा सलग ११वा विजय ठरला. आता भारताचा पुढील साखळी सामना यजमान न्यूझीलंडविरुद्ध १० मार्चला (गुरुवार) रंगणार आहे.
संक्षिप्त धावफलक
भारत – ५० षटकांत ७ बाद २४४ (पूजा वस्त्राकर ६७, स्नेह राणा नाबाद ५३, स्मृती मानधना ५२; नशरा संधू २/३६) विजयी वि. पाकिस्तान : ४३ षटकांत सर्वबाद १३७ (सिद्रा अमीन ३०, डायना बेग २४; राजेश्वरी गायकवाड ४/३१, झुलन गोस्वामी २/२६)