हरियाणा | चरखी-दादरी (हरियाणा) येथे सुरू असलेल्या ६८ व्या महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. शनिवारी महाराष्ट्राने उपउपांत्यपूर्व फेरीत झारखंडचे कडवे आव्हान ४०-२८ असे संपुष्टात आणले. आता महाराष्ट्राच्या पुढील सामना हिमाचल प्रदेश विरुद्ध होणार आहे.
महाराष्ट्राने सुरुवात मोठ्या झोकात केली. मध्यांतराला १७-१२ अशी आपल्या संघाकडे आघाडी होती. उत्तरार्धात मात्र, हे चित्र पालटले. उत्तरार्धात सामना संपायला काही मिनिटे शिल्लक असताना झारखंडने बाजू फिरविली आणि २४-२३ अशी आघाडी घेतली. त्यावेळी महाराष्ट्राची पूजा शेलार एकटीच खेळाडू शिल्लक होती. पूजाने तिच्या चढाईत बोनस गुण तर घेतलाच आणि ४ गडी बाद करत महाराष्ट्राला पुन्हा स्पर्धेत आणले. त्यानंतर संघाने मागे वळून न पाहता झारखंडवर लोण देत मोठी आघाडी घेतली. महाराष्ट्राच्या पूजा यादवने सुरुवातीला गडी टिपत सतत संघाला आघाडीवर ठेवले. दुसरीकडे, पूजा शेलारने शेवटच्या क्षणी महाराष्ट्राला तारले. तिने अष्टपैलू कामगिरी करत संघाच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला.
इतर सामन्यात भारतीय रेल्वेने आंध्र प्रदेशाला ५७-१४ गुणांनी, बिहारने कर्नाटकला २९-२२ गुणांनी, राजस्थानने प. बंगालला ३८-२१ गुणांनी, पंजाबने छत्तीसगडला ४९-३१ गुणांनी आणि हिमाचालने गुजरातला ४६-१५ गुणांनी पराभूत करत उपांत्यपूर्व फेरी गाठली.