साई’ केंद्रासह मराठवाड्यात आधुनिक क्रीडा सुविधा निर्माणासाठी कटिबद्ध- केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.कराड

दत्ताभाऊ पाथ्रीकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

औरंगाबाद:-औरंगाबाद जिल्हा ऑलिम्पिक संघटनेतर्फे राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त आयोजित क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे म्हणाले साई क्रीडा प्रशिक्षण केंद्रासह मराठवाड्यात आधुनिक क्रीडा सुविधांच्या निर्माणासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच औरंगाबादेत केंद्रीय क्रीडा विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्यासाठी निश्चितपणे पाठपुरावा करण्यात येईल,असे आश्वासन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री यांनी दिले.या प्रसंगी माजी शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा, महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे माजी कार्याध्यक्ष डॉ.दत्ताभाऊ पाथ्रीकर, ऑलिम्पिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन मुळे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्यात क्रीडा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या खेळाडू, क्रीडा संघटकांशी संवाद साधताना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.कराड म्हणाले, ‘खासदार असतानाच मी साई क्रीडा प्रशिक्षण केंद्रात नवनव्या सुविधा कशा येतील याविषयी पाठपुरावा करीत होतो. तत्कालीन क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनाही साई केंद्रात आमंत्रित करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाने औरंगाबादेत घोषित केलेले क्रीडा विद्यापीठ अन्य शहरात गेले असले तरी आगामी काळात केंद्रीय क्रीडा विद्यापीठाचे उपकेंद्र औरंगाबादेत सुरू करण्यासाठी निश्चितपणे पाठपुरावा करण्यात येईल. सध्या मणिपूर येथे देशातील पहिले क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. त्यामुळे केंद्रीय क्रीडा विद्यापीठ औरंगाबादेत होऊ शकत नाही. उपकेंद्र कसे होईल यासाठी प्रयत्न करण्यात येतील.’

‘साई क्रीडा प्रशिक्षण केंद्रात विविध खेळांच्या आधुनिक सुविधा आहेत. आगामी काळात त्यात आणखी काही सुविधांची भर पडणार आहे. साई केंद्रात नियमितपणे प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे (एक, दोन वर्ष कालावधीचे डिप्लोमा कोर्स) आयोजन करण्यात येते. परंतु, दीर्घकालीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम साई केंद्रात सुरू होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे सांगत डॉ.कराड म्हणाले, ‘साई क्रीडा केंद्राच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. तसेच औरंगाबादच नव्हे तर मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये आवश्यकतेनूसार क्रीडा सुविधांसाठी निधी मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. त्यासाठी क्रीडा संघटनांनी योग्य प्रस्ताव तयार करून पाठवावा. प्रत्येक दिवस महत्त्वाचा असून त्यासाठी क्रीडा संघटनांनी आता वेळ न दवडता आपल्या भागात गरजेनूसार क्रीडा सुविधा निर्माण करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवावेत.‘

खेळाच्या माध्यमातून शारीरिक तंदुरुस्ती व मानसिक तंदुरुस्ती या दोन्ही गोष्टी उत्तम ठेवणे सहज शक्य आहे. खेळ हा जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. क्रीडा क्षेत्राला चालना देणे गरजेचेच आहे आणि माझ्या मंत्रालयामार्फत शक्य तेवढी मदत करण्याचा आपण प्रयत्न निश्चितपणे करणार आहोत, असे डॉ. कराड यांनी सांगितले.

डॉ. दत्ताभाऊ पाथ्रीकर यांना मी अगदी विद्यार्थी असल्यापासून ओळखतो. क्रीडा क्षेत्रातील त्यांचे योगदान मोलाचे आहे. आता त्यांनी मराठवाड्यातील क्रीडा सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी कार्य करावे अशी अपेक्षा डॉ. कराड यांनी यावेळी व्यक्त केली.

गेल्या सहा दशकांपासून क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे माजी कार्याध्यक्ष व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी क्रीडा विभाग प्रमुख डॉ. दत्ताभाऊ पाथ्रीकर यांना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना डॉ. दत्ताभाऊ पाथ्रीकर म्हणाले, ‘डॉ.कराड हे मंत्री नसतानाही साई केंद्रातील सुविधांचे आधुनिकीकरणासाठी पाठपुरावा करीत आहेत. आता तर ते केंद्रात अर्थ राज्यमंत्री आहेत. साहजिकच आता त्यांच्याकडून खूप अपेक्षा वाढलेल्या आहेत. ग्रामीण भागातील खेळाडूंना आधुनिक सुविधांची अत्यंत आवश्यकता आहे. त्यादृष्टीने त्यांनी ठोस काही केले पाहिजे. साई केंद्राचे दरवाजे मराठवाड्यातील खेळाडूंना कायम खुले राहिले पाहिजेत यासाठी डॉ. कराड यांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. माझा हा जीवनगौरव पुरस्कार मराठवाड्यात कार्यरत असणाऱ्या सर्व खेळाडू, प्रशिक्षक, संघटक व प्रसिद्धी माध्यमांमध्ये कार्यरत असणाऱ्यांना मी समर्पित करतो असे डॉ. पार्थीकर यांनी सांगितले.

माजी शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी औरंगाबाद शहरात गेल्या तीन-चार दशकांपासून कार्य करणाऱ्या विविध खेळांतील क्रीडा संघटकांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा दिला. केंद्रीय विद्यापीठाचे केंद्र औरंगाबादेत असावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. औरंगाबादचे खेळाडू आता राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर औरंगाबादचा नावलौकिक वाढवताना दिसत आहेत. खेळाडू, प्रशिक्षक, संघटक प्रचंड मेहनत घेताना दिसत आहेत. आधुनिक क्रीडा सुविधा आता काळाची गरज असल्याचे दर्डा यांनी सांगितले.

औरंगाबाद जिल्हा ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे यांनी प्रास्ताविक केले. केंद्रीय क्रीडा विद्यापीठाचे उपकेंद्र तसेच साई केंद्राला रिझनल केंद्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी डॉ. कराड यांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा भारसाखळे यांनी यावेळी व्यक्त केली. अमृत बिऱ्हाडे यांनी खुमासदार शैलीत सूत्रसंचालन केले. ऑलिम्पिक संघटनेचे सचिव गोविंद शर्मा यांनी आभार मानले.

दत्ताभाऊ पाथ्रीकर हे
जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी

आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराचे मानकरी

औरंगाबाद- स्मिता डबीर(पारगावकर),फुलंब्री- एकनाथ ढेके,वैजापूर- बाळासाहेब व्यवहारे,गंगापूर- प्रा. उदय तगारे,पैठण-निलेश गायकवाड,खुलताबाद-कुरेशी मोहम्मद अख्तर,कन्नड-प्रवीण शिंदे,सोयगाव -संदीप चौधरी

विशेष सत्कार- सुरेंद्र मोदी (अनेक राष्ट्रीय आंतराष्ट्रीय खेळाडू घडवणारे अॅथलेटिक्स कोच)

आदर्श क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार खालील प्रमाणे प्रदान करण्यात आले

खो-खो – उदय पांड्या, कबड्डी -दत्ता टेके,बास्केटबॉल- प्रशांत बुरांडे, रायफल शूटिंग- गीता मस्के, जिम्नॅस्टिक – प्रवीण शिंदे, योगा -छाया मिरकर, अॅथलेटिक्स – पूनम राठोड, फुटबॉल – सय्यद सलीमुद्दीन, क्रिकेट -अनंत नेरळकर, तलवारबाजी – सागर मगरे, हॉकी -संजय तोटावाद,बॅटमिंटन- ऋतुपर्ण कुलकर्णी,टेबल टेनिस -मनोज कानडोजे,जलतरण -अजय दाभाडे,ट्रायथलॉन -निखिल पवार ,तायक्वांदो- चंद्रशेखर जेऊरकर,बॉक्सिंग शहर – अजय जाधव, जुडो-भीमराज राहाने,सॉफ्टबॉल- डॉ. रंजन बडवणे,बेसबॉल -मयुरी गायके,आट्यापाट्या – अनिल मोटे,नेटबॉल – रमेश प्रधान,सुपर सेवन क्रिकेट- सागर रूपवते,किक बॉक्सिंग- ऐश्वर्या जगताप,कराटे -प्रफुल दांडगे,जंपरोप -अभिजीत नरवडे , टेनिसबॉल क्रिकेट-सौरभ मिरकर,हापकिदो- मनीष धावणे,हॉलीबॉल शहर -लोकेश ठाकरे,श्रशाँग मार्शल आर्ट -प्रताप कदम,ग्रेप लिंक- अविनाश वाडे , विटी-दांडू -तानाजी ढेपले, साखळी स्पोर्ट्स -राजेंद्र ठेंगे, हँडबॉल – मुक्तार शेख,सॉफ्ट टेनिस -निलेश हारदे, शितोरीये कराटे -आदिती दाभाडे,पिकल बॉल- करिश्मा कालिके ,कॉर्फबॉल – विश्वास कड,गदायुद्ध – पंकज आडे ,रब्बी -वैशाली चव्हाण,युनिक फाईट- अमृता अंभोरे,वुडबॉल -शरद पवार,फ्लोरबॉल- बाजीराव भुतेकर,रिंग टेनिस -सिद्धी कुलकर्णी,थ्रोबॉल -यशवंत कचरू पाटील,स्केटिंग -सोनाली आंबे,सायकलिंग -पूजा आंबे,मार्बल टारगेट- सुशील अंभोरे,व्हीलचेअर फेन्सिंग -संजय भूमकर,स्क्वॅश- दीपक भारद्वाज,लंगडी -ज्योती पार्केलू,प्यारा ओलंपिक- सौ मीरा बाशा,टेनिस व्हॉलिबॉल -प्रमोद महाजन,बॉक्सिंग ग्रामीण -लक्ष्‍मण कोळी,सायकल पोलो- कैलास जाधव,किक बॉक्सिंग- चंद्रकांत लांडे,मिनी गोल्फ- संतोष अवचार,वुशू -सुमित खरात (शहर),वुशू -शेख मुदस्सीर (ग्रामीण),फूट साल- आकिब सिद्दिकी,क्रीडा भारती- विनय राऊत, डॉजबॉल -प्रा. शिंदे नारायण देवराव,मल्लखांब- साईचंद्र वाघमारे,एरियल स्पोर्ट्स -प्रज्वल भनक,टारगेट बोल – श्रीनिवास मोतीयेळे,फ्लाइंग शटल – डॉ. रोहिदास गाडेकर, हाफ पिच क्रिकेट – डॉ. अभिजित देशमुख,पिच्यांक सिलॕट – अक्षय पाडुरंग सोनवने, सिलंबम – कुनाल आनंदराव पाटील,मोंटॅक्स बालक्रिकेट – सागर शेवाळे,हॉलीबॉल ग्रामीण- आबासाहेब शिरसाठ, हँडबॉल (ग्रामीण)- अंबादास राठोड,सायकलिंग -अतुल जोशी,चेस – विलास राजपूत,नेट बॉल- रमेश प्रधान,आत्या पाट्या- अनिल मोरे,वेटलिफ्टिंग- वरून दीक्षित,कुंफू – शिवानंद जाकापुरे,लॉनटेनिस- गजेंद्र भोसले,रायफल शूटिंग- हेमंत मोरे,सौरभ गोसावी -रोपस्किपिंग,किशोर नावकर-ॲडव्हेंचर स्पोर्ट्स,महेश इंगळे- बास्केटबॉल,समीना पठाण – महिला फुटबॉल शूटिंग- गीता बापूराव म्हस्के.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. मकरंद जोशी, डॉ. दिनेश वंजारे, डॉ. संदीप जगताप, नीरज बोरसे, विश्वास जोशी, अब्दुल कदीर, कुलजितसिंग दरोगा, प्रदीप खांड्रे, लता कलवार यांच्यासह ऑलिम्पिक संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला होता.

You might also like

Comments are closed.