कोलकाता- बीसीसीआयने ( (BCCI) भारतीय क्रिकेटर विराट कोहली आणि ऋषभ पंतला वेस्ट इंडिज विरुद्धच्या (IND vs WI) शेवटच्या टी-२० सामन्याआधीच बायो बबलमधून ब्रेक दिला आहे. त्यामुळे दोन्ही खेळाडू आपआपल्या घराकडे रवाना झालेत. ते दोघेही वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात सहभागी होणार नाहीत.
बीसीसीआयने विराट कोहली आणि ऋषभ पंतला १० दिवसांचा ब्रेक दिल्याचं वृत्त आहे. त्यामुळेच दोघेही श्रीलंके विरुद्धच्या ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेत सहभागी होणार नाही. २४ फेब्रुवारीपासून लखनौमध्ये श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिक सुरू होत आहे. यानंतर श्रीलंका आणि भारतात २ सामन्यांची कसोटी मालिका देखील होणार आहे. यात विराट कोहली आणि ऋषभ पंत सहभागी होतील. विशेष म्हणजे श्रीलंकेविरुद्धची पहिली कसोटी मालिका कोहलीसाठी १०० वा कसोटी सामना असेल.
दरम्यान, वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने ८ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात कोहली आणि पंत दोघांनीही शानदार अर्धशतकी खेळी केली. कोहलीने सुरुवातीला डाव संभाळला, तर पंतने सामन्याच्या अखेरीस दमदार कामगिरी केली.
कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर रंगलेल्या रोमांचक टी-२० सामन्यात भारताने वेस्ट इंडीजला ८ धावांनी मात दिली. या विजयासह तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत रोहित ब्रिगेडने २-० अशी विजयी आघाडी घेतली. वेस्ट इंडीजचा कप्तान कायरन पोलार्डने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताकडून विराट कोहली आणि ऋषभ पंत यांनी दमदार अर्धशतके ठोकत पाहुण्यांना १८७ धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजने दमदार झुंज दिली. निकोलस पूरन आणि रोवमन पॉवेल यांनी मोठ्या फटक्यांची आतषबाजी करत संघाला विजयाजवळ नेले, पण त्यांची झुंज अपुरी ठरली. विंडीजचा संघ २० षटकात ३ बाद १७८ धावांपर्यंतच पोहोचू शकला. भुवनेश्वर कुमारला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.