वॉर्नबाबत गावस्कर काय म्हणाले नक्की वाचा;

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा मातब्बर फिरकीपटू शेन वॉर्नबाबत चुकीच्या वेळी प्रतिक्रिया व्यक्त केल्यामुळे भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. वॉर्नविषयी आपल्याला प्रचंड आदर असून त्याच्यासह ऑस्ट्रेलियाचे माजी यष्टिरक्षक रॉडनी मार्श यांच्या आत्मास शांती लाभो, असेही मंगळवारी ‘इन्स्टाग्राम’वर टाकलेल्या चित्रफितीत गावस्कर म्हणाले.

 

लेगस्पिनर वॉर्नचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. थायलंडमधील कोह सामुई येथे ५२ वर्षीय वॉर्नने अखेरचा श्वास घेतला. सोमवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान गावस्कर यांनी वॉर्न हा सर्वोत्तम क्रिकेटपटू नसल्याचे मत व्यक्त केले. त्यांच्या या विधानावर ऑस्ट्रेलियासह जगभरातील क्रीडाप्रेमींनी टीका केली. तसेच गावस्कर यांनी त्याच मुलाखतीदरम्यान वॉर्न हा अन्य फिरकीपटूंपेक्षा कसा वेगळा होता, याविषयीही भाष्य केले. मात्र त्यानंतर श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असल्याचे ते म्हणाल्याने क्रिकेटप्रेमी नाराज झाले.

वॉर्न नक्कीच ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम फिरकीपटू होता. मात्र त्या वेळी मी माझे वैयक्तिक मत व्यक्त केले. वॉर्नविषयी मला प्रचंड आदर असून त्याच्यासह रॉडनी मार्श यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच माझी प्रार्थना आहे,’’ असेही गावस्कर यांनी सांगितले. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी मिळवणाऱ्यांच्या यादीत वॉर्न ७०८ बळींसह दुसऱ्या स्थानी असून मुरलीधरनच्या खात्यात ८०० बळी आहेत. परंतु वॉर्नला भारतात एकदाच डावात पाच बळी मिळवण्याची किमया साधता आली.

सद्य:स्थिती पाहता मुलाखत घेणाऱ्याने वॉर्नसंदर्भातील प्रश्न न विचारणे उचित ठरले असते. त्याने प्रश्न विचारल्यावर मीसुद्धा उत्तर देणे टाळणे गरजेचे होते. चुकीच्या वेळी वॉर्नविषयी प्रतिक्रिया व्यक्त केल्याचा मला खेद आहे,’’ असे ७२ वर्षीय गावस्कर म्हणाले.

You might also like

Comments are closed.