मोहाली –मोहालीत पहिला कसोटी सामना रंगणार आहे. हा विराटचा १००वा कसोटी सामना असेल.भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिका ४ मार्चपासून सुरू होत आहे. मोहालीत पहिला कसोटी सामना रंगणार आहे. या सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आपले १०० कसोटी सामने पूर्ण करेल. अशी कामगिरी करणारा तो १२वा भारतीय खेळाडू असेल. या सामन्यात विराट त्याच्या ८००० कसोटी धावाही पूर्ण करू शकतो. असा विक्रम करणारा कोहली हा सहावा भारतीय फलंदाज ठरणार आहे. कसोटीत ८००० धावा पूर्ण करण्यापासून तो फक्त ३८ धावा दूर आहे. त्याच्या आधी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सुनील गावसकर, वीरेंद्र सेहवाग आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी हा पराक्रम केला आहे.
मोहाली कसोटीच्या पहिल्या डावात विराटने ३८ धावा केल्या तर कसोटीत सर्वात जलद ८००० धावा करणारा तो पाचवा भारतीय खेळाडू ठरेल. तो १६९ डावांत हा धावांचा आकडा गाठेल. सचिनने अवघ्या १५४ डावात ८००० धावा पूर्ण केल्या होत्या. सचिन हा कसोटीत सर्वात वेगवान आठ धावा करणारा फलंदाज आहे. त्याच्यापाठोपाठ राहुल द्रविडने १५८ डावात, वीरेंद्र सेहवागने १६० आणि सुनील गावसकर यांनी १६६ डावात ही कामगिरी केली होती. विराट गेल्या दोन वर्षांपासून धावांसाठी झगडत आहे. त्याचे शेवटचे शतक नोव्हेंबर २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध झाले होते. विराटच्या कारकिर्दीतील ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा त्याला सलग दोन वर्षे शतक झळकावता आलेले नाही.
विराट कोहलीचा श्रीलंकेविरुद्धचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. या संघाने शेवटचा भारत दौरा केला तेव्हा विराटने तीन सामन्यांत ६१० धावा केल्या होत्या. या मालिकेत त्याने नागपुरात २१३ आणि दिल्लीत २४३ धावा केल्या. श्रीलंकेविरुद्धही त्याने सलग तीन शतके झळकावली आहेत. आपल्या जुन्या रेकॉर्डवरून प्रेरणा घेत विराट या मालिकेत शतकांचा दुष्काळ संपवू शकतो.